COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : महावितरणची एक चूक औरंगाबादमधल्या एका निष्पाप गरीब माणसाच्या मृत्यूला कारणीभूत ठरली आहे. अवघ्या एका खोलीच्या पत्र्याचं हे घर आहे  जगन्नाथ शेळके या भाजी विक्रेत्याचं. रोज भाजी विकून हा माणूस आपला संसार चालवायचा. एक टीव्ही, एक लाईट आणि एक पंखा इतकीच काय ती जगन्नाथ शेळके यांच्या घरातली विजेवर चालणारी साधनं. मात्र महावितरणनं त्यासाठी बिल पाठवलं ते तब्बल साडे आठ लाखांचं. यानं जगन्नाथ जबर हादरले. याबाबत त्यांनी महावितरणच्या अधिका-यांकडे दादही मागितली. मात्र त्यांना कुणीच प्रतिसाद दिला नाही.


अखेर महावितरणची वसूली करणा-यांनी थेट घरच जप्त करण्याची धमकी दिली. त्यामुळे पार खचलेल्या जगन्नाथ शेळके यांनी अखेर गळफास घेत आपलं जिवन संपवलं. आत्महत्या करण्यापूर्वी, वीजबिल जास्त आल्यानं जीवन संपवत आहे अशी चिठ्ठीही त्यांनी लिहून ठेवली. प्रत्यक्षात जगन्नाथ शेळके यांचं बील 3 हजाराचं आलं होतं. मात्र त्यांचं जुनं मीटर बदलून नवं मीटर लावल्यानं ही चूक झाल्याचं महावितरणचं म्हणणं आहे. या प्रकरणी सुशील कोळी या कर्मचाऱ्याला महावितरणनं निलंबित केलं आहे. 


 जगन्नाथ शेळके यांच्या मागे पत्नी आणि एक मुलगा आहे. महावितरणच्या चुकीच्या बिलानं शेळके यांचं अख्खं कुटुंब उद्धवस्त झालंय. आणि महावितरण मात्र ही प्रशासकीय चूक असल्याचं सांगत हात वर करत आहे.