अवघ्या २५ किलो वजनाची `सुटकेस कार` पाहिलीत का?
एखादी कार म्हटलं की वातानूकुलित, वेगवान, प्रशस्त असंच काहीसं चित्र आपल्या डोळ्यांसमोर येतं. मात्र, जळगावच्या अवलियांनी अवघ्या २५ किलो वजनाची एक कार तयार केलीय.
विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव : एखादी कार म्हटलं की वातानूकुलित, वेगवान, प्रशस्त असंच काहीसं चित्र आपल्या डोळ्यांसमोर येतं. मात्र, जळगावच्या अवलियांनी अवघ्या २५ किलो वजनाची एक कार तयार केलीय.
ही सुटकेस प्रवासाचं सामान घेऊन जाण्यासाठी नाही तर ही सुटकेस चक्क तुम्हालाच घेऊन जाऊ शकते. आश्चर्य वाटलं ना... पण हे खरं आहे. जळगावच्या रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी 'इनोव्हेटीव्ह पोर्टेबल सुटकेस' या प्रकल्पा अंतर्गत, टाकाऊ वस्तुंपासून ही इलेक्ट्रिक सुटकेस कार तयार केलीय. या कारमध्ये इलेक्ट्रिक हब मोटार, ४८ व्होल्ट बॅटरी, स्पिड कंट्रोलर आणि मिनी व्हिल्सचा वापर करण्यात आलाय.
संपूर्ण वीजेवर चालणारी ही कार एकदा चार्ज केल्यानंतर २५ किलोमीटर धावते. या कारचे वजन अवघे २५ किलो असून, पार्किंगची डोकेदुखीही नाही. या सुटकेस कारची निर्मिती सध्या केवळ प्रोजेक्टसाठी करण्यात आली असून भविष्यात सुधारणा करुन ती रस्त्यावर उतवण्याचाही विद्यार्थ्यांचा मानस आहे.
रतन टाटा यांच्या स्वप्नातील सर्वसामान्यांसाठीची नॅनो आपण पाहिली. आता या विद्यार्थ्यांची ही सुटकेस कार गरिबांचे चारचाकीचे स्वप्न पूर्ण करणारी ठरो हीच अपेक्षा...