रेल्वे प्रवाशांसाठी गूडन्यूज! उन्हाळी सुट्टीनिमित्त रेल्वेच्या 28 विशेष फेऱ्या; आजच करा बुकींग, पाहा वेळापत्रक
Railway News : उन्हाळी सुट्टीनिमित्त तुम्ही जर गावी जाण्याचा विचार करत असाल तर मध्य रेल्वेकडून 28 विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या उन्हाळी विशेष फेऱ्या कुठून ते कुठंपर्यंक असणार आहे, ते जाणून घ्या.
summer special train in marathi : उन्हाळ्याच्या सुट्ट्या जवळ येत आहेत. त्यातच मे महिना येताच शालेय विद्यार्थ्यांच्या सुट्ट्या सुरु होतात. त्यामुळे अनेकजण प्रवासाचे नियोजन करतात. मुलांना शाळेच्या सुट्ट्या असल्याने अनेकजण गावी जातात. याचपार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने 28 अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी मध्य रेल्वेने 156 उन्हाळी स्पेशल ट्रेनची घोषणा केली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवरील उन्हाळी विशेष गाडीची संख्या 184 वर पोहोचली आहे.
रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई - मऊ / कोचुवेली दरम्यान 28 अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्यांचे आरक्षण सोमवार 8 एप्रिल 2024 पासून भारतीय रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि IRCTC वेबसाइटवर सुरू होईल.
ट्रेन क्रमांक 01079 सीएसएमटी- मऊ विशेष ट्रेन बुधवार 10 एप्रिल 2024 आणि 1 मे 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून रात्री 10.35 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी मऊ येथे सकाळी 11.10 वाजता पोहोचेल.
तर ट्रेन क्रमांक 01080 विशेष ट्रेन रोजी मऊ येथून शुक्रवार, 12 एप्रिल 2024 आणि 3 मे 2024 रोजी दुपारी 1.10 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी रात्री 12.40 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01463 एलटीटी-कोचुवेली साप्ताहिक विशेष ट्रेन 11 एप्रिल 2024 ते 27 जून 2024 दरम्यान दर गुरुवारी दुपारी 4 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 8.45 वाजता कोचुवेली येथे पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01464 साप्ताहिक विशेष कोचुवेली 13 एप्रिल 2024 ते 29 जून 2024 दरम्यान दर शनिवारी 4.20 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 9.50 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईला पोहोचेल.
या स्थानकांवर असेल थांबा
एलटीटी-कोचुवेली साप्ताहिक स्पेशल ट्रेन ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड, मडगाव जंक्शन, कारवार, कुमटा, कुंदापुरा, उडुपी, मंगळुरू जंक्शन, कासारगोड, कन्नूर, कोझिकोडे, तिर्नासुरम, तिरनासुरम जंक्शन, कोट्टनम थिरुवल्ला, चेंगन्नूर, कायमकुलम आणि कोल्लम जं. थांबेल.
आजच करा येथून आरक्षण
उन्हाळी स्पेशल ट्रेन 01079 आणि 01463 साठी विशेष बुकिंग 8 मे 2024 रोजी सर्व आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उघडेल. विशेष गाड्यांच्या तपशीलवार वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.