NEET-UG परीक्षा पुन्हा होणार? सुप्रीम कोर्टात मोठ्या घडामोडी
सुप्रीम कोर्टात NEET-UG प्रकरणी आज महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. SC विद्यार्थ्यांच्या याचिकांवर ही सुनावणी होणार आहे. याचिकेत कथित पेपर लीक प्रकरणाची फेरतपासणी आणि योग्य तपास करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या याचिकांवर सुनावणी होणार आहे.
NEET-UG प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा महत्त्वाची सुनावणी होणार आहे. अशा परिस्थितीत NEET UG 2024 ची परीक्षा रद्द करून NEET-UG परीक्षा पुन्हा होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. सुप्रीम कोर्ट या याचिकेवर निर्णय देण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार आणि NTAच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केल्यानंतर CBI ने ही प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे.
केंद्र आणि NTA च्या प्रतिज्ञापत्रात काय?
NEET-UG प्रकरणी विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत कथित पेपर लीक प्रकरणाची फेरपरीक्षा आणि योग्य तपास करण्याची मागणी करण्यात आलीय. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील अनियमिततेशी संबंधित याचिकांवर सुनावणी सुरू आहे. केंद्र आणि NTA ने 5 मे रोजी झालेल्या परीक्षेत कोणत्याही प्रकारची मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाली नसल्याचं म्हटलं आहे. आता CBIने ही सर्वोच्च न्यायालयात उत्तर दाखल केले आहे. बुधवारी केंद्र सरकार आणि NTA यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. केंद्र सरकारने नीट परीक्षा पुन्हा घेणार नसल्याचं आधीच न्यायालयाला सांगितले आहे.
मागच्या सुनावणीत सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?
न्यायालयाने केंद्र आणि एनटीएला प्रश्नपत्रिका सुरक्षित कशी ठेवली, ती परीक्षा केंद्रावर कशी पाठवली आणि संभाव्य प्रश्नपत्रिका कशी लीक होऊ शकते अशी विचारणा केली होती. या संपूर्ण प्रक्रियेबाबत तुमची शपथपत्रे दाखल करा असं कोर्टाने म्हटलं होतं. कथित पेपरफुटीच्या परिणामावर न्यायालय समाधानी नसेल, तर शेवटचा उपाय म्हणून फेरपरीक्षेचे आदेश दिले जातील, असेही न्यायालयाने म्हटले होते.
NTA च्या प्रतिज्ञापत्रात काय म्हटलंय..
कथित अनियमितता केवळ पाटणा आणि गोधरा केंद्रांमध्येच घडली आहे. वैयक्तिक उदाहरणांच्या आधारे संपूर्ण परीक्षा रद्द करू नये. जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी मोजक्याच केंद्रांवरून येतात, असे म्हणणे चुकीचे आहे. या गैरप्रकारात सहभागी विद्यार्थ्यांचे निकाल रोखून धरण्यात आले असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई आणि हकालपट्टीसाठी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.