जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'जनादेश यात्रा' आणि खासदार सुप्रिया सुळे यांची 'संवाद यात्रा' सुरु असताना दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. राष्ट्रवादीत असताना ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना भाजपमध्ये घेऊन कोणत्या वॉशिंग पावडरने स्वच्छ करता, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, सुप्रियांच्या या टीकेला मुख्यमंत्र्यांनी आज भुसावळमध्ये उत्तर दिले. भाजपकडे वॉशिंग पावडर नसून विकासाचं डॅशिंग केमिकल असल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. राष्ट्रवादीत नेत्यांना भवितव्य राहिलेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते पक्षाला सो़डचिठ्ठी देत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणालेत.



मुख्यमंत्री यांनी यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीचाही समाचार घेतला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भाजपच्या महाभरतीची नाही तर स्वतःच्या पक्षांना लागलेल्या महागळतीची चिंता करावी, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला. 


दरम्यान, तापी प्रकल्पासाठी ६ हजार कोटींची तरतूद केल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ईव्हीएमवर टीका करणाऱ्यांनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडे बोल सुनावले. परीक्षेत नापास झाला तर अभ्यास झालेला नाही हे कारण असतं पेन कसा जबाबदार? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारला.