Supriya Sule: `आलं तर आलं तुफान...`, सुप्रिया सुळे यांची पोस्ट चर्चेत!
Supriya Sule Share Inspirational Lines: अजित पवारांच्या `राज्य`कारणावर आता सुप्रिया सुळे यांनी टीका करण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) बैठकीत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना टोले लगावले होते
Supriya Sule On Maharastra Politics: महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेतेपदी बसलेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली अन् संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली आहे. अजित पवारांनी थेट शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविरुद्ध बंड पुकारल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेस दुभागली गेलीये. अशातच अजित पवारांच्या 'राज्य'कारणावर आता सुप्रिया सुळे यांनी टीका करण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) बैठकीत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना टोले लगावले होते. अशातच आता सुप्रिया सुळे यांनी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्या काही ओळी शेअर केल्या आहेत.
काय आहे पोस्ट?
आलं तर आलं तुफान...
तुफानाला घाबरून काय करायचं
तुफानाला तोंड द्यायला शिकलं पाहिजे
तुफानापासून पळून जाणाऱ्या
माणसाच्या हातून काही घडत नाही.
तुफानाला तोंड देण्याची
जी शक्ती आणि इच्छा आहे
त्यातनं तो काहीतरी करू शकतो
आणि घडवू शकतो
अशी माझी धारणा आहे.
- यशवंतराव चव्हाण
पाहा ट्विट
अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी आले होते. त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी यशवंतरावांच्या ओळी शेअर केल्या आहेत. या माध्यमातून पुरोगामी विचारधारा आम्ही कायम ठेवत आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न शरद पवार गटाकडून होतोय, अशी चर्चा होताना दिसत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. काही लोक म्हणतात की ज्यांचे वय झाले त्यांनी केवळ आशीर्वाद द्यावेत. पण वय हा केवळ आकडा आहे, लढण्याची जिद्द हवी, असे प्रत्युत्तर सुप्रिया सुळेंनी दिलं होतं. सत्ता येते आणि जाते, मात्र केवळ सत्तेतून सुख मिळत नाही. आपल्या वडिलांना घरी बसून आशीर्वाद देण्याची वक्तव्यं करणाऱ्यांपेक्षा आमच्यासारख्या मुली परवडल्या, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना लगावला होता.