सुप्रिया सुळे यांचा असाही निर्भीडपणा.. आंदोलकांना एकट्या भिडल्या..
हजारोंच्या संख्येने एसटी कर्मचारी सिल्वर ओकवर दाखल झाले होते.
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'सिल्वर ओक' निवासस्थानी गराडा घालत आंदोलन केले. या आंदोलनाची चाहूल अगदी राज्य गुप्त वार्ता विभागालाही लागू दिली नाही. इतकी गुप्तता बाळगण्यात आली होती.
हजारोंच्या संख्येने एसटी कर्मचारी सिल्वर ओकवर दाखल झाले होते. पोलिसांची कुमकही अपुरी पडत होती. या आंदोलनाची माहिती मिळताच खा. सुप्रिया सुळे यांनी तातडीने सिल्वर ओकवर धाव घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या मुंबई प्रदेश कार्याध्यक्षा राखी जाधव होत्या.
एसटी कर्मचारी दगडफेक, चप्पलफेक करत होते. ते आक्रमक झाले होते. अशावेळी राष्ट्रवादीचेही कार्यकर्ते आक्रमक झाले होते. संपकरी एसटी कर्मचारी, महिला आणि राष्ट्रवादीचे संतप्त कार्यकर्ते आमनेसामने आले. कोणत्याही क्षणी काहीही घडेल असे वाटत असताना खा. सुप्रिया सुळे या तेथे दाखल झाल्या.
येथे आल्यावर त्यांनी सर्वप्रथम 'माझे आई, वडील, मुलगी आतमध्ये आहे. त्यांची सुरक्षा मला महत्वाची आहे. आधी त्यांना भेटून येऊ द्या, मग मी बोलते, असं सांगितले. मात्र, येथे वाढता गोंधळ पाहून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शांत रहावे. क्रियेला प्रतिक्रिया देऊ नये, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना शांत केले.
त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी आपला मोर्चा आंदोलक कर्मचाऱ्यांकडे वळविला. आंदोलकांच्या गराड्यात थेट घुसून त्यांनी सांगितलं की, तुम्ही आधी शांत व्हा. मी चर्चेला तयार आहे. माझे आई, वडील, मुलगी आत घरात आहेत. त्यांची भेट घेऊन मी पुन्हा येते. पण, तुम्ही आधी शांत व्हा. शांततेच्या मार्गाने तुम्ही चर्चा करणार असला तर मी चर्चेला तयार आहे, असे सांगत खा. सुप्रिया सुळे यांनी कर्मचाऱ्यांना शांततेचं आवाहन केलं.
संतप्त झालेल्या या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांची खा. सुप्रिया सुळे यांनी थेट भेट घेतली. शांततेच आवाहन केले इतकंच नव्हे तर त्या थेट आंदोलकांशी भिडल्या.