जळगाव : घरकुल घोटाळ्यातील मुख्य आरोपी सुरेश जैन यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बहुचर्चित घरकुल घोटाळ्याप्रकरणी सुरेशदादा नाशिकरोड कारागृहात शिक्षा भोगत आहेत. शुगर, बीपी आणि मूत्रशयाचा त्रास वाढल्याने प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जातयं. मात्र, कार्डियालॉजिस्ट नसल्यानं त्यांना जे. जे. हॉस्पिटल येथे पाठवावे लागणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरेश जैन घरकुल घोटाळ्याप्रकरणी मागील काही काळापासून तुरुंगात आहेत. मागील काही महिन्यांपासून ते नाशिकच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आहेत. आज अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.


राज्यातील बहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळ्यात माजी मंत्री गुलाबराव देवकर, सुरेश जैन यांच्यासह ४८ आरोपींना दोषी ठरवण्यात आले होते. धुळे जिल्हा न्यायालयात न्यायाधीश डॉ. सृष्टी नीलकंठ यांनी शिक्षेची सुनावणी केली होती. यानुसार शिवसेना नेते आणि माजी मंत्री सुरेश जैन यांना सात वर्षांची शिक्षा, १०० कोटींचा दंड, तर राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना पाच वर्षाची शिक्षा, राजेंद्र मयूर जगन्नाथ वाणी यांना सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. तब्बल २० वर्षांनंतर या घोटाळ्याचा निकाल लागला.


जळगाव घरकुल योजना ही जळगाव नगरपालिकेची योजना होती. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना स्वस्त दरात चांगली घरे देण्यासाठी तत्कालीन नगरपालिकेतील सत्ताधारी गटाने झोपडपट्टी निर्मुलनाच्या उद्देशाने ही योजना राबवण्याचे ठरविले होते. ११ हजार घरकुले बांधण्याच्या कामाला १९९९ मध्ये सुरुवात केली होती. मात्र, यात गैरव्यवहार झाला आणि तो सिद्ध झाला.