Sushma Andhare यांचा नितेश राणेंना सवाल; वडिलांचे वस्त्रहरण करणाऱ्या देवेंद्रजींना तू नेता कसे काय स्विकारले?
Sushma Andharen criticizes Nitesh Rane : सुषमा अंधारे यांनी प्रिय नीतू बाळा म्हणत एक फेसबुक पोस्ट लिहीली आहे आणि यासोबत देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओसुद्धा शेअर केला आहे
Sushma Andhare : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या विरोधकांवर शरसंधान साधत आहेत. राज्याच्या राजकारणात घडणाऱ्या घडामोडींवरुन त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) कुचकामी ठरल्याचं वारंवार सिद्ध होत आहे. फडणवीसांना विसर पडतो की ते राज्याचे गृहमंत्री आहेत. मात्र, ते एका पक्षाचे पदाधिकार आणि गृहमंत्री असल्यासारखे वागतात, अशी टीका त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली होती. त्यानंतर आता त्यांना राणे पिता पुत्रांवर आपला मोर्चा वळवला आहे. नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सुषमा अंधारे यांचा एक व्हिडीओ ट्विट करत बाळासाहेब ठाकरेंची थिल्लरपणे टवाळी करणाऱ्यांच्या हातात शिवबंधन? असा सवाल केला होता. त्याला आता सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टद्वारे नितेश राणेंवर निशाणा साधला आहे. यासोबत त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. "प्रिय नीतू बाळा, तुझा अभ्यास फारच कच्चा आहे. तुला अजून होमवर्कची गरज आहे. तब्बल वीस वर्षापूर्वीचा माझा महाविद्यालयीन वाद विवाद स्पर्धेतला व्हिडिओ शेअर करताना किमान चेहरा पट्टीतील बदल तरी तू लक्षात घ्यायला हवा होतास. पण असू दे बाळा. मुळात माझ्या भावाने तुझ्या अभ्यासाकडे व्यवस्थित लक्ष दिलं असतं तर तू आता अशा अर्ध्या कच्च्या संकल्पना घेऊन बोलत राहिला नसतास, असे सुषमा अंधारे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
"स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल सन 2015 सालचं तुझं ट्विट ही जर तुझी आज चूक असेल तर ते तू अजूनही डिलीट का केले नाहीस किंवा गाणं सम्राज्ञी लता मंगेशकरजी या मोदीजींच्या स्टेजवर गेल्या म्हणून तू त्यांचा भारतरत्न परत मागितला या तुझ्या बालिश वक्तव्यांवर मी अजिबात बोलणार नाही. मी तुला अस्सल व्हिडिओ तुझ्या आजमितीला असणाऱ्या प्राणप्रिय नेत्याचा तुला पाठवत आहे. भर सभागृहात आपल्याच सख्ख्या वडिलांचे म्हणजेच माझ्या भावाचे वस्त्रहरण करणाऱ्या देवेंद्रजींना तू नेता कसे काय स्वीकारले असेल बरे? हा व्हिडिओ ऐकल्यावर जर तुला काही शंका उपस्थित होणार असतील तर नक्की विचार मला पुन्हा एकदा अभ्यास घ्यायला आवडेलच. तुझी आत्या," असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.