सिंधुदुर्ग : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गाच्या स्थानिक राजकारणात घडामोडी वेगाने वळण घेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला शब्द दिला असून आपला भाजपा प्रवेश निश्चित असल्याचे राणेंनी जाहीर केले. पण भाजपाचा मित्रपक्ष शिवसेना सुरुवातीपासून या विरोधात आहे. विधानसभा निवडणुकीत राणेंच्या मुलांना उमेदवारी मिळाली तर शिवसेना आपला उमेदवार उभा करेल असे वक्तव्य शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी केले होते. राणेंच्या भाजपा प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले नसताना 'महाराष्ट्र् स्वाभिमान'चे मालवण तालुका अध्यक्ष आणि नगरसेवक मंदार केणी यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री इथे जाऊन मनगटात शिवबंधन बांधले. केणी यांच्यासह आणखी तीन नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. यतीन खोत हे महाराष्ट्र् स्वाभिमानचे नगरसेवक आहेत तर शैलजा गिरकर आणि दर्शना कासवकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका आहेत. यांनी शिवसेनेची वाट धरली आहे. 



'राणेंना भाजपा प्रवेश मिळणार नाही'


राणे भाजपात गेल्याने शिवसेनेला फरक पडत नाही पण खात्री आहे की राणेंना भाजपात प्रवेश मिळणार नाही असे वक्तव्य शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केले आहे. राणेंची भाजपामध्ये ओढाताण होतेय त्यांना भाजपात प्रवेश देत नाहीये. राणेंसोबतचे कार्यकर्ते शिवसेने सोबत येत आहेत त्यांचा शिवसेना सन्मान करतेय. राणे आपल्या मुलांच्या स्वार्था साठी भाजपात जात आहेत लोकांना ते माहीत आहे त्यामुळे कार्यकर्ते त्यांच्या सोबत राहणार नाहीत. राणे सोबतचे अनेक कार्यकर्ते शिवसेनेसोबत येत आहेत लवकरच प्रवेश होतील असेही त्यांनी स्पष्ट केले.