Nitin Gadkari On Pan Masala Spitters: रस्त्यावरुन चालताना किंवा प्रवासादरम्यान आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधी रस्त्यावर थुंकून अस्वच्छता पसरवणारी एखादी तरी व्यक्ती भेटलीच असेल. अशा व्यक्तींना पाहिल्यावर अनेकदा आपल्या तळपायाची आग मस्तकात जाते. काहीजण अशा लोकांना समजवून सांगतात मात्र अनेकांना अशा लोकांचं करायचा काय असा प्रश्न पडतो. याच प्रश्नाचं उत्तर थेट केंद्रीय रस्ते वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरींनी दिलं आहे. बुधवारी 'स्वच्छ भारत अभियान' मोहिमेअंतर्गत नागपूर महानगरपालिकेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना गडकरींनी यासंदर्भात भाष्य केलं. 


स्वच्छतेचं महत्त्व समाजावून सांगितलं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नितीन गडकरींनी आपल्या भाषणामध्ये स्वच्छतेचं महत्त्व सांगताना स्वत:पासूनच सुरुवात केली. आपण पूर्वी चॉकलेट खाऊन त्याचा कागद कारच्या खिडकीतून बाहेर फेकायचो. मात्र आता आपण असं करत नसल्याचं ते म्हणाले. महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेदरम्यान गडकरींनी पर्यावरण जपण्यासाठी आणि निसर्ग प्रदुषणमुक्त ठेवण्यासाठी एकल वापर प्लॅस्टिकचा वापर टाळण्याचं आवाहन त्यांनी केलं. 


मलाही आधी चॉकलेटचे कागद कारच्या खिडकीतून बाहेर फेकण्याची सवय होती पण...


"लोक हल्ली फार स्मार्ट झाली आहेत. चॉकलेट खाल्ल्यानंतर ते लगेच त्याचा कागद फेकून देतात. मात्र परदेशात जातात तेव्हा चॉकलेट खाऊन झाल्यानंतर कागद खिशात ठेवतात. परदेशात ते अधिक चांगलं वागतात," असं गडकरी म्हणाले. पुढे त्यांनी आपल्यालाही कारच्या खिडकीतून चॉकलेटचे कागद बाहेर फेकण्याची सवय होती असं म्हणाले. मात्र आता आपण चॉकलेट खाल्ल्यानंतर तो कागद घरी आल्यानंतर कचऱ्याच्या डब्यात टाकतो, असं गडकरींनी आवर्जून सांगितलं. 


सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांचं करायचं काय हे ही सांगितलं


सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेसंदर्भात बोलताना नितीन गडकरींनी सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांचं काय करायचं याबद्दल एक सल्ला दिला. पान मसाला खाऊन रस्त्यावर थुंकमाऱ्यांचे फोटो काढले पाहिजेत. हे फोटो पेपरात छापून कोण रस्त्यावर थुंकतं हे लोकांना दाखवलं पाहिजे, असा सल्ला गडकरींनी दिला. "महात्मा गांधींनी असे प्रयोग करुन पाहिले होते," असं गडकरींनी सांगितलं.


टाकाऊपासून टिकाऊ तयार करण्याचा सल्ला


नागपूरचे खासदार असलेल्या गडकरींनी टाकाऊ वस्तूंपासून संपत्ती निर्मितीचे मार्ग शोधता येतील असंही म्हणाले. त्यांनी टाकावू पदार्थांपासून बायोप्रोडक्ट्स तयार करण्याचा सल्ला दिला.



देशभरात 'स्वच्छ भारत अभियान'


देशातील सर्वच शहरांमध्ये 'स्वच्छ भारत अभियान' मोहिम सुरु करण्यात आली आहे. रेल्वेबरोबरच इतर अनेक संस्था या मोहिमेमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे.