पुणे : गेली अनेक वर्ष मी समाजाला संघटित करण्यासाठी राज्यभरात दौरे केले. यावेळी समाजाला, छत्रपती शिवाजी महाराज ( Chatrapati Shivaji Maharaj ), छत्रपती शाहू महाराज ( Chatrapati Shahu Maharaj ) यांच्या विचारांना मानणाऱ्या समाजातील सर्व जातीपातीच्या लोकांना संघटित करून त्यांना एकाच छत्राखाली आणण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी 'स्वराज्य' ( SWARAJYA ) संघटनेची स्थापना करत असल्याची घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वराज्यच्या माध्यमातून सगळ्यांना संघटित करून त्यांना दिशा देण्यासाठी आणि गोर गरिबांच्या कल्याणासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


राज्यभरात मी जे दौरे केले त्याच्या माध्यमातून शिवाजी महाराज, शाहू महाराज यांचा विचार पोहोचविण्याची संधी मिळाली. गेल्या २० वर्षात शेतकरी, अतिवृष्टी, ओला दुष्काळ, विद्यार्थी असे अनेक प्रश्न समोर आले. त्यावेळी काही घेतलेले निर्णय यामुळे लोकांचे प्रेम मला मिळाले.


माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी नरेंद्र मोदी यांना सांगितले. त्यांनी राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेची खासदारकी दिली. लोक कल्याणासाठी ते पद स्वीकारले. खासदार झाल्यापासून त्या पदाची गरिमा कायम राखली. राज्यात गडकोट किल्ल्यांचे रायगड प्राधिकरणाचे जे काम सुरु आहे ते देशात कसे सुरु करता येईल हे पाहिले, असे त्यांनी सांगितले. 


२०१७ ला मराठा समाजाचा मुंबईत मोर्चा जमा झाला. त्यावेळी स्टेजवर जाण्याचे कुणी धाडस दाखविले नाही. पण, मी गेलो आणि समाजाला शांत केलं. तेव्हा ते सगळे शांतपणे निघून गेले. महाविकास आघाडीची बाजू घेतली. भाजपला असं वाटलं असेल की विरोधाची भूमिका घेत आहे. पण, मी वेळोवेळी समाजाच्या बाजूनेच भूमिका घेतली, असे त्यांनी स्पष्ट केले.


राज्यसभा खासदारकीचा सहा वर्षाचा माझा कार्यकाळ संपला आहे. पण, अजूनही समाजासाठी काही कामे करणे बाकी आहे. राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. या जागांची गणिते पहाता भाजप - २, राष्ट्रवादी - १,  काँग्रेस - १, शिवसेना - १ अशा जागा निवडून येऊ शकतात. मात्र, राज्यसभेसाठी निवडणूक लढवीत असल्याची घोषणा त्यांनी केली.


मी कुठल्याही पक्षात जाणार नाही. तर अपक्ष निवडणूक लढविणार आहे. माझी कायर्पद्धती पाहिली असेल तर ती राजकारण विरहित समाजाला दिशा दणारी अशीच आहे. त्यामुळे राज्यातील अपक्ष आमदारांनी मला पाठिंबा द्यावा असं आवाहनही त्यांनी केले.