Swiggy Zomato Might Soon Deliver Alcohol : मोबाईलच्या एका क्लिकवर पाहिजे आवडेल तो पदार्थ तुमच्यासमोर हजर होतो. स्विगी, झोमॅटो आणि इतर ऑनलाईन फुट डिलिव्हरी अॅपचं मुल्यांकन देल्या काही वर्षात प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. अशातच आता दारूची सुविधा देखील घरपोच आली तर? विचार करून पाहा... होय, तळीरामांसाठी आता गुड न्यूज समोर आलीये. स्विगी, झोमॅटो आणि बिगबास्केट सारख्या प्लॅटफॉर्मवर लवकरच बिअर, वाइनसारख्या कमी अल्कोहोलयुक्त दारूची होम डिलिव्हरी होऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे. देशातील सर्व राज्यात नव्हे तर काही राज्यातच याची प्रयोग केला जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, नवी दिल्ली, कर्नाटक, हरियाणा, पंजाब, तामिळनाडू, गोवा आणि केरळ या सात राज्यात पथदर्शी प्रकल्पाचा विचार आम्ही करत आहोत, असं उद्योग क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. सध्या फक्त ओडिसा आणि पश्चिम बंगाल या दोनच राज्यात दारूच्या होम डिलिव्हरीला परवानगी आहे. ऑनलाइन डिलिव्हरीमुळे या दोन राज्यातील मद्यविक्रीचं प्रमाण 20 ते 30 टक्के वाढल्याचं निदर्शनात आलं आहे. चेन द बिअर कॅफेचे मुख्य कार्यकारी राहुल सिंह यांनी इकॉनॉमिक टाइम्सला याबाबत माहिती दिली.


दारूच्या होम डिलिव्हरीसाठी यंत्रणा सक्षम असावी लागते. यंत्रणा मजबूत केल्यानंतर राज्यातील ग्राहकांना सुविधा उपलब्ध केली जाऊ शकते, असं चेन द बिअर कॅफेचे मुख्य कार्यकारी राहुल सिंह यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देऊ शकते, असंही त्यांनी म्हटलंय. ऑनलाइन मॉडेल्स एंड-टू-एंड व्यवहार रेकॉर्ड, वय पडताळणी आणि मर्यादांचे पालन अशा नियमांचं पालन करू शकतात, असं स्विगीचे कॉर्पोरेट अफेयर्सचे उपाध्यक्ष दिनकर वशिष्ठ यांनी म्हटलं आहे.


दरम्यान, तरुणांमध्ये वाढत असलेलं अल्कोहोलचं प्रमाण हा विषय ऐरणी वरती आला आहे. त्यामुळे विविध समाज माध्यमातून दारूबंदी विषयीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील दारूबंदी होणार का?  असा सवाल विचारला जातोय. महाराष्ट्रात वर्धा, चंद्रपूर या ठिकाणी दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.