Tadoba Tiger Reserve Shocking News: महाराष्ट्राबरोबरच देशभरातील वन्यप्राणी आणि त्यातही व्यघ्रप्रेमींच्या आकर्षणाचं ठिकाण म्हणजे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प! दरवर्षी उन्हाळ्यामध्ये आणि दिवाळीच्या सुट्टीत या ठिकाणी बुकिंग मिळत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यटकांची, वन्यप्राणी प्रेमींची गर्दी होती. मात्र याच अभयारण्यात नुकत्याच घडलेल्या एका विचित्र घटनेमुळे 10 टूर गाईड वाहनांच्या चालकांना निलंबित करण्यात आलं आहे. यासाठी कारणीभूत ठरला आहे सोशल मीडियावरील एक फोटो. नेमकं हे प्रकरण काय आहे ते पाहूयात...


नेमकं घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर सध्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक वाघीण पर्यटकांच्या जीप गाड्यांच्या मध्यभागी उभी असून या वाघिणीला सर्व बाजूंनी पर्यटकांच्या वाहनांनी घेरलं असल्याचं दिसत आहे. व्याघ्र दर्शनासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या सफारीदरम्यान पर्यटक जिप्सी आणि शासकीय क्रूझर वाहनांनी वाघिणीला घेरावच घातला. वाघिणीच्या सर्व बाजूंनी पर्यटकांची वाहनं असून ती हतबल होऊन मध्यभागी उभी असल्याचा फोटो व्हायरल झाला. या वाघिणीभोवती उभ्या असलेल्या गाड्यांमध्ये पूर्ण क्षमतेने पर्यटक असल्याचं दिसत आहे.


व्यवस्थापनाने केली कठोर कारवाई


वन्य प्राण्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या अशा परिस्थितीसाठी कारणीभूत ठरलेल्या कर्मचाऱ्यांविरोधात प्रकल्प व्यवस्थापनाने कठोर कारवाई केली आहे. वाघिणीला घेराव घालणारी 10 वाहने महिनाभरासाठी पर्यटकांच्या सेवेतून रद्द करण्यात आली आहे. म्हणजेच आता महिनाभर या गाड्यांबरोबच त्या चालवणाऱ्या चालकांनाही काम करता येणार नाही.


हा सारा प्रकार टी-114 वाघिणीबरोबर घडला. या वाघिणीला खातोडा ते ताडोबा गेट मार्गावर अडवण्यात आलं आणि तिच्या सर्व बाजूंनी पर्यटकांच्या जिप्सी तसेच क्रूझर वाहने उभी होती. वाघिणीचा मार्ग अशा पद्धतीने आडवणे सफारीच्या तसेच वन्यप्राणी सुरक्षेच्या नियमांविरोधात आहे. वाघिणीला आडवणाऱ्या वाहनांमध्ये खुंटवडा, मोहर्ली आणि कोलारा या द्वारावर नोंदणी केलेल्या 9 जिप्सींबरोबरच एका शासकीय क्रूझर वाहनाचा समावेश होता. क्रूझरवरील हंगामी चालकाला पर्यटन वाहन चालविण्यापासून नेहमीसाठी निलंबित करण्यात आलं आहे. तर 9 जिप्सी चालकांना प्रत्येकी 3 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. असे प्रकार टाळण्यासाठी सफारीशी संबंधित सर्व घटकांची बैठक पार पडली. अशाप्रकारचे वन्यप्राण्यांना त्रास होईल असे गैरवर्तन टाळण्यासाठी सर्वांना इशारा देण्यात आला.


सर्वाधिक वाघ असलेला व्याघ्र प्रकल्प


ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील प्रमुख राष्ट्रीय उद्यान असून ते चंद्रपूर जिल्हयात आहे. या उद्यानाची स्थापना 1955 साली झाली. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर हे राज्यातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान ठरलं. उद्यानात आढळणाऱ्या मगरी-सुसरी आणि गवा हे इथले मुख्य वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी तब्बल 115 वाघांचं वास्तव्य असून देशातील कोणत्याही व्याघ्र प्रकल्पापेक्षा ही संख्या फार जास्त आहे. वाघांनी सर्वाधिक संख्या असलेला व्याघ्र प्रकल्प म्हणून ताडोबा देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे.