विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : चार चाकी, दुचाकी कुठलीही जुनी गाडी विकत घ्यायची असेल तर ओएलएक्स या संकेतस्थळाचा विचार केला जातो. मात्र, औरंगाबादमधल्या एका नागरिकाला त्याचाच नाहक मनःस्ताप सहन करावा लागलाय. 


काय घडलं नेमकं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबादचे अझर कादरी यांनी ओएलएक्सवर इनोव्हा गाडी विकत घेतली आणि त्यानंतर एका वेगळ्याच गोंधळाला त्यांना सामोरं जावं लागलं. कादरी यांनी ओलएक्सवरुन गाडी खरेदी केली त्याच वेळी त्या गाडीची जाहिरात, राजस्थानमधल्याही काही चोरट्यांनीही पाहिली होती. 


या चोरट्यांनी जयपूरमधल्या एका बँकेवर दरोडा टाकण्यासाठी याच गाडीप्रमाणे आपली गाडी रंगवली आणि त्याच गाडीची नंबरप्लेटही आपल्या गाडीसाठी वापरली. दरोड्यावेळी बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये गाडीचा रंग आणि नंबर टिपला गेला. त्यामुळे जयपूर पोलीस थेट औरंगाबादेत कादरींच्या घरी थडकले. चौकशीत सगळा बनाव उघड झाला आणि पोलिसही अवाक झाले. 


जाहिरात टाकताना सावधान!


या प्रकरणामुळे ओएलएक्सवर जाहिरात टाकताना, तसंच गाडी विकत घेताना खबरदारी घेण्याचं आवाहन, औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी केलं आहे.


चोरटे नेहमीच वेगवेगळ्या शक्कल लढवून गुन्हे करत असतात. त्यामुळे स्वतःची फसगत टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकानंच खरबदारी घेणं गरजेचं आहे.