निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे : लघु पाठबंधारे विभागाच्या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तलाठ्याचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुणे - सातारा महामार्गालगतंच्या भोर (Bhor) तालुक्यातील वरवे गावात घडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अखेर तपासानंतर बुडालेल्या तलाठ्याचा मृतदेह अखेर बचाव पथकाच्या हाती लागला आहे. 6 तासांच्या शोधमोहिमेनंतर भोर मधल्या भोईराज जल अप्पत्ती पथकाला मृतदेह शोधण्यात यश आले. 


मित्रांसोबत तलावात पोहायला गेले गेले असताना तलाठी मुकुंद चिरके हे बुडाले होते.मृतदेह पाण्याबाहेर काढताच घटनास्थळी असलेल्या नातेवाईकांच्या आक्रोशाने उपस्थितांची मनं हेलावून गेली.


३५ वर्षीय मुकुंद त्रिंबकराव चिरके सहा महिन्यापूर्वी वेल्हा येथे तलाठी म्हणून येथे कार्यरत झाले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची बदली भोर येथे झाली होती. सोमवारी सकाळी सात वाजता मुकुंद चिरके हे चार मित्रांसोबत वरवे येथे पोहण्यासाठी गेले होते. पोहताना त्यांना दम लागून ते पाण्यात बुडाले.


मुकुंद चिरके पोहण्यात सराईत होते, मात्र पोहताना त्याचा दम न लागल्यामुळे ते तलावात बुडाले. बुडताना मदतीसाठी त्यांनी धावा केला. सोबत असणाऱ्या मित्रांनी आणि स्थानिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न ही केला. मात्र त्यांना यात यश आलं नाही.


घटनेची माहिती मिळताच तातडीनं प्रांतधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील,मंडलअधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.


मुकुंद चिरके हे मित्रांसोबत रोज ट्रेकिंगसाठी आणि पोहण्यासाठी जातं होते. सोमवारी ते त्यांच्या तीन मित्रांसोबत पोहत असताना चिरके तलावाच्या मध्यभागी असताना त्यांना दम लागला आणि ते बुडाले. भोरच्या भोईराज जल आपत्ती पथकाने तातडीने शोधकार्य सुरू केलं. त्यानंतर सहा तासांनी त्यांना मुकुंद चिरके यांचा मृतदेह शोधण्यात यश आलं. मृतदेह पाण्याबाहेर काढताच घटनास्थळी असलेल्या नातेवाईकांनी आक्रोश केला.