१५ रुपयांचा सातबारा १५० रुपयांना, तलाठ्याकडून शेतकऱ्यांची लूट
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा तलाठ्याला हिसका
नितेश महाजन, झी मीडिया, जालना : पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची सध्या धांदल सुरू आहे. मात्र तलाठ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक मुस्कटदाबी केली जात असल्याचे वास्तव जालना जिल्ह्यात समोर आले आहे. बदनापूर तालुक्यातील चनेगाव सज्जावर शेतकऱ्यांनी सातबारा काढण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी शेतकऱ्यांच्या गर्दीचा फायदा तलाठ्याने उचलल्याचे समोर आले आहे.
चनेगाव सज्जाचा तलाठी आर.बी.नरोटे याने एका सातबाऱ्यासाठी नियमानुसार १५ रुपये लागत असताना प्रती सातबाऱ्यासाठी १५० रुपये उकळल्याचे समोर आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी सज्जात जाऊन तलाठ्याला याविषयी सुनावले. शिवाय ज्या शेतकऱ्यांकडून तलाठ्याने जास्तीचे पैसे उकळले होते त्यांचे पैसे देखील शेतकऱ्यांना परत करण्यास भाग पाडले.
दरम्यान, जालना जिल्ह्यातील बँका शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याच्या निषेधार्थ आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भीक मांगो आंदोलन केले. जाफ्राबाद तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी हातात प्लेट घेऊन शहरातील दुकानांमध्ये जाऊन भीक मागितली. यानंतर जमा झालेले पैसे तहसीलदारांना भेट म्हणून देण्यात आले. शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यासाठी तातडीने बँकांना आदेश द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देण्यात आला आहे.