आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये?(Chandrapur) झाडांवर क्यू आर कोड(QR code) लावण्यात आले आहेत.  झाडाची संपूर्ण माहिती, त्याचे उपयोग आदी बाबी जाणून घेण्यासाठी चंद्रपूर येथील वन प्रबोधनीने अभिनव उपक्रम राबवला आहे. टॉकिंग ट्री या उपक्रमाअंतर्गत  क्यू आर कोड द्वारे झांडांची माहिती मिळणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या क्यूआर कोडचे लोर्कापण राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वन प्रबोधनीच्या परिसरात करण्यात आले. विशेष म्हणजे या क्यूआर कोडच्या माध्यमातून आता झाड स्वत:बद्दलची माहिती स्वत:च देणार आहे.  ‘टॉकिंग ट्री’ म्हणजेच बोलणारे झाड असा हा उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत चंद्रपूर वन प्रबोधनीच्या परिसरातील विविध प्रजातींची झाडे मोबाईलद्वारे ओळखता येऊ शकणार आहेत.  झाडाच्या  प्रत्येक प्रजातीची सविस्तर माहिती दृकश्राव्य माध्यमातून उपलब्ध होणार आहे. वन प्रबोधनी परिसरातील प्रत्येक झाडावर पाटी स्वरुपात क्यूआर कोड लावण्यात येणार आहे. 


‘टॉकिंग ट्री’ या मोबाईल ॲपद्वारे क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर संबंधित झाड स्वत:बद्दल विविध भाषेमध्ये माहिती देणार आहे. वन प्रबोधनी परिसरात मोठ्या प्रमाणात वन व वनेत्तर प्रजातींची झाडे असून या ॲपच्या वापरामुळे परिसरातील जैव विविधतेबद्दल अधिकाधिक माहिती जाणून घेणे शक्य होणार आहे.