आगीचे लोळ आणि स्फोटांच्या आवाजाने नागरिक हादरले; अहमदनगरमध्ये टँकरचा भीषण अपघात
इथेनॉलचा टॅंकर पेटल्याने दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अहमदनगरमध्ये ही दुर्घटना घडली आहे.
Manikdaundi Ghat Accident News : अहमदनगरच्या पाथर्डी (pathardi) तालुक्यातील माणिकदौंडी घाटामध्ये एका इंधन टँकरला भीषण अपघात झाला आहे. टँकर पलटी होऊन प्रचंड मोठी आग लागली. आगीनंतर टँकरचा स्फोट झाला. आगीचे लोळ आणि स्फोटांच्या आवाजाने नागरिक हादरले. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत पाच जणांना वाचवण्यात यश आले आहे. या अपघातामुळे घाटातील वाहतुक विस्कळीत झाली होती.
स्फोटांचे आवाज ऐकून स्थानिक भयभित
माणिकदौंडी रोडवरील केळवंडी शिवारात हा अपघात घडला. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. पाथर्डीकडे येत असलेला इथेनॉल वाहतूक करणारा टँकर माणिकदौंडी घाटामध्ये पलटी झाला. यानंतर काही वेळेतच टँकरमध्ये असलेल्या इंधनाने पेट घेतला. त्यामुळे परिसरामध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले होते. काही क्षणातच टँकरला लागलेल्या आगीने रुद्र धारण रूप धारण केले. त्यामुळे इतर वाहनांना टँकर जवळ जाणंही मुश्किल झाले होते. या आगीमुळे वाहतूक दोन्ही बाजूने बंद झाली होती. टँकर मध्ये डिझेल किंवा इथेनॉल असल्याने स्फोट झाले. स्फोटांचे आवाज ऐकून स्थानिक भयभित झाले होते.
टँकरला लागलेल्या आगीमध्ये दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेत टँकर पूर्णतः आगीच्या विळख्यात सापडला होता. सुरुवातीला या घटनेत कोणतेही जीवितहानी झाली नासल्याची माहिती मिळाली होती. मात्र, क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त टँकर उचलल्यानंतर या घटनेत दोघांचा होरपळून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. गणेश पालवे, सुरैया शेख असे दोन जण या घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर, या घटनेत चार जण जखमी झाले असून जखमींवर पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे.