राज्यात ग्रामीण भागात 2024 पर्यंत प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी - राज्यमंत्री संजय बनसोडे
केंद्र आणि राज्य शासनाच्या समान भागीदारीतून राज्यात जल जीवन मिशन राबविले जात आहे.
लातूर : केंद्र आणि राज्य शासनाच्या समान भागीदारीतून राज्यात जल जीवन मिशन राबविले जात आहे. या मिशन अंतर्गत राज्याच्या ग्रामीण भागातील (rural areas)प्रत्येक कुटुंबाला 2024 पर्यंत नळजोडणी (Tap Water supply) दिली जाणार आहे. यातून प्रत्येक व्यक्तीला प्रतिदिन 55 लिटर पाणीपुरवठा (Water supply) केला जाणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता सार्वजनिक बांधकाम पर्यावरण भूकंप पुनर्वसन रोजगार हमी योजना राज्यमंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode) यांनी केले.
जल जीवन मिशन बाबत जनजागृती व उमेद अभियानाअंतर्गत आर्थिक साक्षरता बँक कर्ज वितरण बाबत आयोजित महिला मेळाव्यात राज्यमंत्री संजय बनसोडे बोलत होते. यावेळी जल जीवन मिशन अभियानाच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ज्योतीताई राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उदगीर पंचायत समितीचे सभापती शिवाजीराव मुळे आदी उपस्थित होते.
जलजीवन मिशन अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला 2024 पर्यंत वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरदोई 55 लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. याअंतर्गत गावागावांमधील प्रत्येक कुटुंबाला अधिकाधिक प्रति लिटर पाणी कसे मिळेल यावर भर देत आहोत, असे संजय बनसोडे म्हणाले.
जलजीवन अभियानाविषयी जनजागृती
तसेच पिण्याच्या पाण्यासंदर्भात आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाकांक्षी असलेल्या जलजीवन अभियानाविषयी जनजागृती होण्यासाठी आजच्या महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या दिवशी या मेळाव्यासाठी विविध क्षेत्रात सक्षमपणे नेतृत्व करणाऱ्या 600 हून अधिक महिला या मेळाव्यासाठी उपस्थित आहेत व या अभियानाची ग्रामस्तरावर मोठ्या प्रमाणावर यांच्यामार्फत प्रबोधन करण्यात येईल, असा विश्वास वाटतो असे राज्यमंत्री बनसोडे यांनी म्हटले.
अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या आवश्यक गरजा म्हणून गणल्या जातात. पण यापुढे शुध्द पाणी आणि स्वच्छता या दोन घटकांची जोड देणे आवश्यक आहे. कारण हीच पंचसूत्री आपल्याला येणाऱ्या काळात तारणहार ठरणार आहे. कारण पाणी आहे तर जीवन आहे असे आपण म्हणतो. त्यामळे पिण्याचे पाणी स्वच्छ आणि चांगले उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे. व या मिशन अंतर्गत ते ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्यास शासन कटिबद्ध असल्याचे राज्यमंत्री बनसोडे यांनी सांगितले.
महिला बळकटीकरण
महिलांच्या बळकटीकरण व उन्नतीकरणासाठी राज्य शासन अनेक योजना राबवित आहे. याचाच एक भाग म्हणून आपण आता उमेद या सामाजिक संस्थेबरोबर अनेक उपक्रम राबवित आहोत. शेतीत काम करणाऱ्या महिला ह्या खऱ्या अर्थाने ‘करिअर वुमन’ आहेत. घर, मुलेबाळे सांभाळून त्या दिवसभर शेतात राबतात. देशाच्या कृषी प्रगतीत त्यांच्या कष्टाचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. कुटुंब आणि करिअर या दोन्ही बाबी एकाच वेळी सांभाळण्याची शक्ती स्त्रियांमध्ये आहे. ग्रामीण असो किंवा शहरी असो, दोन्ही भागातील महिला आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर यशस्वी होतात. त्यामुळे महिलांच्या कार्यशक्तीचा आपल्याला नेहमीच अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार श्री बनसोडे यांनी महिला शक्ती बाबत काढले.
महिलांचे सामाजिकरण
बचत गटाच्या माध्यमातूनही महिलांचे सामाजिकरण होत असून शासनामार्फत बचतगट चळवळीस गती दिली जाईल. महिला बचत गट घेत असलेल्या कर्जाची १०० टक्के परतफेड करतात. त्यांचा प्रामाणिकपणा व स्वाभिमान इतर कर्ज परत न करणाऱ्या उद्योगपतींच्या तुलनेत कितीतरी मोठा आहे. म्हणूनच देश व राज्याच्या प्रगतीत महिलांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याने आशा स्वयंसहाय्यता बचत गटांच्या माध्यमातून राज्य शासन महिलांच्या भक्कमपणे पाठीशी उभे असल्याची ग्वाही राज्यमंत्री बनसोडे यांनी दिली.