गजानन  देशमुख, झी मीडिया, हिंगोली : सध्या उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे थंड पेयांची मागणी वाढली आहे. यामुळे सरबत तसेच ज्युस सेंटरवर मोठी गर्दी पहायला मिळते. या शीत पेयांसाठी वापरले जाणारे पाणी आणि बर्फ यामुळे आरोग्य धोक्यात येवू शकते. असाच किळसवाणा प्रकार हिंगोली(Hingoli) येथे घडला आहे. ज्यूसमधे वापरला जाणारा बर्फ रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आला होता. रस्त्यावर फिरणारा मोकाट कुत्रा हा बर्फ चाखत होता. अत्यंत किळसवाणा असा हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे (Shocking News). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उन्हाळा वाढत असल्याने नागरिकांच्या घशाला कोरड पडते.  यामुळेच उन्हाळ्याच्या सिजनमध्ये ज्यूस सेंटरवर मोठी गर्दी पहायला मिळते. मात्र, हिंगोलीच्या कळमनुरी शहरातील एका ज्यूस सेंटर समोरचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे शीत पेयासाठी वापरल्या जाणारा बर्फ कशा प्रकारे हाताळला जातो हे उघड झाले आहे.   


ज्युस सेंटरला बर्फ पुरवणारे बर्फ उत्पादक करणारे व्यक्ती सकाळीच बर्फाची लादी ज्यूस सेंटरच्या बाहेर नेऊन टाकतात. काही ज्यूस सेंटरमध्ये तेथील कामगार ज्यूस सेन्टरमध्येच वास्तव्यास असल्याने ती लोक बर्फाची लादी ज्यूस सेंटरमध्ये नेऊन सुरक्षित ठेवतात.


मात्र, अनेक ज्यूस सेंटर सकाळी दहा नंतर उघडतात. यामुळे ज्युस सेंटर चालक दुकान सुरु करेपर्यंत त्यांचा बर्फ ज्युस सेंटरच्या बाहेर रस्त्यावरच पडून राहतो. हिंगोलीत ज्युस सेंटर बाहेर ठेवण्यात आलेला बर्फ  कुत्रे चाखताना दिसत आहेत. हा अत्यंत किळसवाणा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 


हा अत्यंत गंभीर प्रकार असून नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारा आहे. असाच एक व्हिडीओ एका ज्यूस सेंटरच्या नामफलकासह सोशल मीडियावर  व्हायरल होत आहे.  ज्यांनी हा व्हिडीओ व्हायरल केलाय त्या व्यक्तीने हा व्हिडीओ कळमनुरी शहरातील बस स्थानक परिसरात असलेल्या ज्यूस सेंटर समोरचा असल्याचा दावा केला आहे.  अशा प्रकारचा या निष्काळजी करणाऱ्या ज्यूस सेंटर चालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरीक करत आहेत.