यवतमाळ येथे गृहराज्यमंत्र्याच्या उपस्थित शिक्षक प्रलंबित प्रश्नांवरची सभा वादळी
जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी घेतलेली सहविचार सभा वादळी ठरली.
यवतमाळ : जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी घेतलेली सहविचार सभा वादळी ठरली.
शिक्षकांच्या समस्यांचे निराकरण व्हावे म्हणून अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार असलेल्या डॉ. रणजित पाटील यांनी यवतमाळ जिल्हा परिषद सभागृहात विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी समक्ष शिक्षकांची सहविचार सभा घेतली. मात्र शिक्षकांनी असंख्य प्रश्नांची सरबत्ती केल्याने मंत्री गोंधळून गेले.
शिक्षकांच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांची उत्तरही समाधानकारक नव्हती त्यामुळे तब्बल ५ तास गोंगाटातच सभा चालली. यावेळी अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनातील त्रुटीचा मुद्दा शिक्षकांनी उचलून धरला.
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध, संचमान्यता दुरुस्ती, पोषण आहार, महिन्याच्या पहिल्या तारखेला वेतन,अशा विविध प्रश्नांचा भडीमार शिक्षकांनी केला. ह्या सभेतून गृहराज्यमंत्री रणजीत पाटील शिक्षकांचे प्रश्न सोडवू शकत नाही त्यामुळे आपल्या मर्जीतील शिक्षक संघटना बळकट करण्यासाठीच हा सभेचा फार्स रणजित पाटील यांनी केला असा आरोपही अन्य शिक्षक संघटनांनी केला.