संस्थाचालकाच्या जाचाला कंटाळून शिक्षकाची गळफासाने आत्महत्या
लातूर जिल्ह्यातील उदगीर इथे एका शिक्षकाने संस्थाचालकांच्या जाचाला कंटाळून शाळेतच गळफास लावून आत्महत्या केली
लातूर : लातूर जिल्ह्यातील उदगीर इथे एका शिक्षकाने संस्थाचालकांच्या जाचाला कंटाळून शाळेतच गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी या शिक्षकाने लिहिलेल्या पत्रात आपणास वैयक्तिक त्रास होत असल्याचं नमूद केलं. तर त्यांच्या नातेवाईकांनी संस्थाचालक विजयकुमार चव्हाण आणि राजकुमार चव्हाण हे शिक्षकाचा छळ करत असल्यानेच केशव जाधव यांनी आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे. उदगीर जवळच्या तुकाराम नाईक प्राथमिक विद्यालयात केशव जाधव हे शिक्षक म्हणून कार्यरत होते.
संस्थाचालकाने त्यांच्याकडे असलेला मुख्याध्यापक पदाचा कार्यभार काढून घेतल्या पासून त्यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती. तर स्कुल बसचे भाडे देण्यासाठी संस्थाचालकाने केशव जाधव यांचा पगारही कापून घेतल्याने ते तणावाखाली होते असा आरोप जाधव यांच्या पत्नीने केला आहे. याबाबत संस्थाचालक विजयकुमार चव्हाण हे कॅमेऱ्यापुढे काहीही न बोलता सर्व आरोप निराधार असल्याचे सांगत आहेत. याप्रकरणी उदगीर पोलीस अधिक तपास करीत आहेत.