पाण्याची पातळी घटल्याने धरणातील मंदिर दिसू लागले
धरण रिकामी झाली असून कधी नव्हे ते त्या धरणातीलतील अनेक मंदिर समोर दिसू लागले आहे.
योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : राज्यात सर्वत्र दुष्काळाचे चित्र आहे धरणांचा जिल्हा असलेल्या नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा झाला. त्यामुळे धरण रिकामी झाली असून कधी नव्हे ते त्या धरणातीलतील अनेक मंदिर समोर दिसू लागले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा धरणात अशीच एक सुंदर पेशवेकालीन सभागृह असलेलं मंदिर लोकांसाठी खुले झाले.
भग्नावस्थेत असलेलं हे शंकराचं मंदिर आहे. या मंदिरासमोर नंदी ही आहे. त्याची जागा आणि तोंडाची दिशा बदललेली आहे. कधीकाळी सुंदर असलेल्या या वास्तूचं धरणातील पाण्याने आणि पावसामुळे भग्नावशेष अस्ताव्यस्त झाले आहे. आठशे वर्षांपूर्वीचे हे मंदिर असून बाजूलाच असलेले स्तंभ ऐतिहासिक समृद्धीची साक्ष देत आहे. युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांचीची आठवण करुन देणारे एक स्तंभ असून त्यात नंदी कोरलेले आहेत. काळया पाषाणात कोरलेल्या नक्षी चौथऱ्याची स्तंभ त्याचबरोबर सभागृहातील कळस, आतील नक्षी सुद्धा काही प्रमाणात जीर्ण झाल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी पेशवेकालीन अशी समृद्ध वास्तुशैलीची मंदिर आपल्याला आढळतात. मात्र आता पाणी कमी होऊ लागल्याने धरणातील गोदावरी नदीतील मंदिर समोर येऊ लागली आहेत. या मंदिराजवळ असलेल्या वांझोळे गावातील लोकांना यामुळे आनंद झाला. शासनाने मदत देऊन हे मंदिर पुन्हा उभे करावे अशी त्यांची मागणी आहे.
नाशिक जिल्हा हा मंदिरांची नगरी म्हणून देशभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे समृद्ध असलेला हा वारसा जतन करण्याची गरज या निमित्ताने व्यक्त होते आहे.