लघुशंकेसाठी थांबले आणि तिथेच घात झाला; समृद्धी महामार्गावर अत्यंत भयानक अपघात
समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात झाला आहे. यात एकाच कुंटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे.
Accident On Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarg) अपघातांचे सत्र सुरुच आहे. समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात अत्यंत भयानक अपघात झाला आहे. बुलढाणा जवळ झालेल्या या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघे जण ठार झाले आहेत. प्रवासादरम्यान ते लघुशंकेसाठी थांबले असताना त्यांचा घात झाला आहे.
शेषराव मांटे (वय 48 वर्षे), तुषार गजानन मांटे (वय 34 वर्षे) आणि ओम विजय मांटे (वय 20 वर्षे) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. हे सर्व जण एकाच कुंटुंबातील आहेत. या तिघांसह वाहनातून एकूण सहा जण प्रवास करत होते. हे सर्व जण देऊळ गाव राजा तालुक्यातील डिग्रस येथे राहणारे आहेत.
कसा झाला अपघात?
समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील फर्दापुर जवळ हा अपघात झाला. सिमेंट मिक्सर ट्रकच्या धडकेत या तिघाचा मृत्यू झाला. पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला आहे. डिग्रस येथील मांटे कुटुंबीय टाटा निस्सान क्र. एम. एच. २८ ए झेड ७५४६ ह्या वाहनाने वाशिम येथे आयोजित असलेला कुटुंबातीलच लग्नसोहळ्यासाठी गेले होते. लग्न सोहळा आटोपून ते मालेगावकडून परत येत होते. दरम्यान, फर्दापुर नजीकच्या चॅनेल क्र. 283 जवळ वाहन थांबवून, त्यातील तिघे जण लघुशंकेसाठी जात होते. त्याचवेळी मार्गावरुन भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात सिमेंट मिक्सर ट्रकने त्यांना उडविले. यात तिघांचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच फर्दापुर पोलीस मदत उपकेंद्राचे पीएसआय शैलेश पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना मेहकर येथील सरकारी दवाखान्यात हलविले. तेथे उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिघेही मृत झाल्याचे सांगितले. तिन्हीही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मेहकर येथील सरकारी रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. अपघाताची माहिती मोबाईलद्वारे तसेच समाजमाध्यमातून कळताच डिग्रस गावावर व संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर भाविकांच्या वाहनाला अपघात
सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर भाविकांच्या वाहनाला अपघात झाला आहे. यात एक चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. तर, 12 जण जखमी झालेत. कोंडी गावाजवळ हा अपघात झाला. मुंबईहून तुळजापूरकडं देवदर्शनासाठी निघालेल्या दोन वाहनांना पाठीमागून धडक दिल्यानं हा अपघात झाला आहे.
मद्यधुंद अवस्थेत पोलीस निरीक्षकाने युवकांना दिली धडक
सातारा - फलटण मार्गावर मद्यधुंद अवस्थेत एका पोलीस निरीक्षकाने कारने युवकांना धडक दिली आहे. दोघेही किरकोळ जखमी आहेत. अपघातानंतर संतप्त जमावाने पोलीस निरीक्षकाला चोप दिला. दादासाहेब पवार असं संबंधित पोलीस अधिका-यांचं नाव आहे.