Maharashtra Politics News : ठाकरे गटाचे कोकणातील नेते संदेश पारकर (Sandesh Parkar) यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि भाजप नेते रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांची भेट घेतली. भाजप कार्यकारिणीतही ठाकरे गटातील नेत्यांना गळाला लावण्याचे आदेश देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर संदेश पारकर आणि रवींद्र चव्हाण भेटीमुळे चर्चांना उधाण आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई-गोवा महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. तसेच काही ठिकाणचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे. हा महामार्ग गणपतीपूर्वी होणे शक्य नाही. त्यामुळे या महामार्गाची एक लेन गणेशोत्सवापूर्वी सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याची पाहणी करण्यासाठी मंत्री रवींद्र चव्हाण सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले आहेत. यावेळी संदेश पारकर यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. 


फडणवीस यांनी ठाकरे गटाबाबत मोठे वक्तव्य


दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ठाकरे गटातील अनेक नेते अस्वस्थ आहे. ते भाजपच्या संपर्कात आहेत, असे संकेत त्यांनी यावेळी बोलताना दिलेत. येत्या काळात याची तुम्हाला प्रचिती येईल, असा दावा फडणवीस यांनी केला आहे. याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांना सहजच भेटायचे होते. कालची भेट ही अराजकीय होती, गप्पांसाठी होती असे फडणवीस म्हणाले. 


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची काल रात्री उशिरा भेट घेतली. शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी फडणवीसांनी भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाली. भेटीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे गुलदस्त्यात आहे. मात्र, दिल्ली दौ-यानंतर फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आले आहे. 


मध्यंतरी सिंधुदुर्गच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. एकेकाळचे कट्टर वैरी असललेले राणे आणि पारकर एकाच पक्षात आले. परंतु, पुन्हा त्यांच्यात फूट पडली आणि पारकर शिवसेनेत गेले. पारकर गेल्या काही काळापासून शिवसेनेत सक्रीय नव्हते. भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत ठाकरे गटातील अस्वस्थ नेत्यांना आपल्या बाजुने करा, असा आदेश देण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर संदेश पारकर यांच्या भेटीचे महत्त्व वाढले आहे. 


 संदेश पारकर हे आधी राष्ट्रवादी सक्रीय होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राज्यात विधायक राजकारण करण्यास सक्षम असलेला काँग्रेस हा एकमेव पक्ष असल्याचे सांगत पारकर काँग्रेसमध्ये दाखल झालेत. पारकर हे सातत्याने पक्ष बदलत असल्याने ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार का, याची चर्चा सुरु झाली आहे.