`या छोट्या पप्पूने तुम्हाला महाराष्ट्रभर पळवलंय` हिम्मत असेल तर... आदित्य ठाकरे यांचं ओपन चॅलेंज
Maharashtra Politics अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले केंद्र सरकारला अशी लोकं कशी चालतात
Maharashtra Politics : शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Abdul Sattar) यांचा उल्लेख 'छोटा पप्पू' असा उल्लेख केला होता. तसंच आदित्य ठाकरे यांचा रणछोडदास असंही म्हटलं होतं. आता आदित्य ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांच्या टीकेला प्रत्युतर दिलं आहे. कृषीमंत्री मला छोटा पप्पू म्हणतात, मी असे छोटा पप्पू, मला नाव ठेवा पण जनतेची कामं करा, या छोट्या पप्पूने तुम्हाला महाराष्ट्रभर पळवलंय, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
आदित्य ठाकरे यांचं ओपन चॅलेंज
तसंच आदित्य ठाकरे यांनी ओपन चॅलेंजही दिलं आहे. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो आणि 40 गद्दारांनी राजीनामा द्यावेत, होऊन जावू द्या, असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे. ऋतुजा लटके (Rutuja Latke) विजयी झाल्याने आता आमचे 16 आमदार झाले आहेत. 40 गद्दार आमदार पळून गेलेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये मुख्यमंत्री कोण ते समजत नाही, गद्दारचा शिक्का कपाळावर घेऊन ते फिरतायत असं सांगत आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटातील (Shinde Group) आमदारांचा गद्दार असा उल्लेख केला.
'दुष्काळ जाहीर करा, नाहीतर खूर्ची खाली करा'
शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंतची कर्ज आमच्या सरकारने माफ केली. राज्यात साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक आणली, मला शेतातील जास्त कळत नाही, पण शेतकऱ्यांचं दु:ख कळतं, उद्धवजी असते तर ओला दुष्काळ जाहीर झाला असता असं सांगत आदित्य ठाकरे यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, नाहीतर खूर्ची खाली करा अशी मागणी केली. राज्यात अजूनही शेतीचे पंचनामे झालेले नाहीत, दिवाी शिधा वाटपातही घोटाळा झाला असून त्यावरही आम्ही आवाज उठवणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
अब्दुल सत्तारांच्या त्या वक्तव्याचा निषेध
काही महिन्यातच हे सरकार कोसळणार, लवकरच निवडणुका लागणार आहेत, तयार राहा असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. तसंच अब्दुल सत्तार यांनी सुप्रियाताईंविषयी वापरेला शब्द अत्यंत घाणेरडा आहे. केंद्र सरकारला अशी लोकं कशी चालतात अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.