Shivsena Vs Shivsena:  राज्यात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूरमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान पार पडले. तर, 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी आज अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. शिंदे शिवसेनेने १० जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. त्या पैकी 8 जागांवर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे. तर, रामटेक आणि कोल्हापूरमध्ये मात्र काँग्रेससोबत शिवसेना लढत होणार आहे. 


विशाल पाटील यांची बंडखोरी कायम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनीही बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला होता. काँग्रेस आणि शिवसेनेचा दबाव झुगारून विशाल पाटलांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळं आता सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपाचे संजयकाका पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील अशी लढत होणार आहे. 25 पैकी शेवटच्या दिवशी पर्यंत 6 अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली आहे.


कोणत्या मतदारसंघात कोणते उमेदवार याची यादी


१) मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघः शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या विरोधात ठाकरे गटाचे अनिल देसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दक्षिण मध्य मतदारसंघातून  2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल शेवाळे यांनी कॉंग्रेस उमेदवार एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला होता. शिंदे गटाकडून त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. 


२) मावळ लोकसभा मतदारसंघः शिंदे गटाचे श्रीरंग बारणे विरुद्ध ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांच्यात लढत होणार आहे. 2014, 2019च्या लोकसभेमध्ये मावळ मतदारसंघातून श्रीरंग बारणे निवडून आले होते.


३) हातकणंगले लोकसभा मतदारसंघः ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील  आणि शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यात लढत होणार आहे. 


४) शिर्डी लोकसभा मतदारसंघः शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे विरुद्ध ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे यांच्यात लढत होणार आहे.


५) संभाजीनगर लोकसभा मतदारसंघः छत्रपती संभाजीनगरात महाविकास आघाडीकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेकडून (शिंदे गट) मंत्री संदीपान भुमरे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.


६) हिंगोली लोकसभा मतदारसंघः या मतदारसंघातही शिवसेना विरुद्ध शिवसेना यांच्यात लढत होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर, ठाकरे गटाकडून नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


७) यवतमाळ - भावना गवळींना डावलून यवतमाळमधून शिवसेना शिंदे गटाने राजश्री पाटील यांना उमेदवारी घोषित केली आहे. तर, ठाकरे गटाने संजय देशमुख यांना रिंगणात उतरवले आहे.


८) बुलढाणा - बुलढाण्याचे विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर यांना पुन्हा एकदा शिंदे गटाकडून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. चिखलीकरांना शह देण्यासाठी ठाकरे गटाने नरेंद्र खेडेकर यांना मैदानात उतरवले आहे.