आताची मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात मोठी घडामोड, ठाकरे गटाच्या रोशनी शिंदेंवरच गुन्हा दाखल
ठाण्यातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना काल शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली होती. आज त्यांच्याविरुद्धच पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Shinde Group vs Thackeray Group : ठाण्यातील ठाकरे गटाच्या (Thackeray Group) कार्यकर्त्या रोशनी शिंदे (Roshani Shinde) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती. गवस नावाच्या व्यक्तीने रोशनी शिंदे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आज संध्याकाळी शिंदे गटाचे कार्यकर्ते पोलीस आयुक्तालयात दाखल झाले. यात नरेश म्हस्के आणि माजी उपमहापौर मिनाक्षी शिंदे या देखील होत्या. त्यांनी ठाणे अतिरिक्त पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि रोशनी शिंदेविंरोधात तक्रार केली.
रोशनी शिंदे यांना मारहाण
फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी शिंदे गटाच्या (Shinde Group) महिला कार्यकर्त्यांनी रोशनी शिंदे यांना मारहाण केली होती. ही घटना सोमवारी रात्री 10.30 ते 11 वाजण्याच्या सुमारास घडली. ठाण्यातील कासरवडवली इथं रोशनी शिंदे त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडत असताना त्यांच्यावर शिंदे गटाच्या महिलांनी अचानक हल्ला केला. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. रोशनी शिंदे यांनी प्रेग्नन्सी होण्यासाठीची ट्रीटमेंट सुरू असतानाही आपल्याला मारहाण करण्यात आली असा आरोप केलाय. पोलीस स्टेशनमध्ये प्रचंड त्रास होत असूनही पोलिसांनी दुर्लक्ष केलं असा आरोपही त्यांनी केलाय. मात्र माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी हे आरोप फेटाळलेत.
उद्धव ठाकरे यांनी घेतली भेट
ठाण्यात मारहाण झालेल्या युवासेना कार्यकर्ती रोशनी शिंदे यांची उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे भेट घेतली. ठाण्यात जाऊन ठाकरे दाम्पत्य रोशनी शिंदे यांची भेट घेतली. दुपारी 1 वाजता रूग्णालयात जाऊन विचारपूस केली. यावेळी आदित्य ठाकरेही उपस्थित होते. रोशनी शिंदे सध्या आयसीयूमध्ये दाखल आहेत.
उद्धव ठाकरे संतापले
रोशनी शिंदे (Roshni Shinde) यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. राज्याला एक फडतूस गृहमंत्री लाभला आहे अशा शब्दांत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली आहे. लाचार, लाळघोटेपणा करणारा उपमुख्यमंत्री, नुसती फडणवीसी करणारा व्यक्ती गृहमंत्री म्हणून मिरवत आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.