खचाखच भरलेल्या लोकल ट्रेनमधून 17 वर्षीय मुलीचे अपहरण, ठाण्याहून थेट साताऱ्यात नेले, अन्...
Mumbai Local Train News: मुंबई लोकल ट्रेनमधून एका 17 वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे. या प्रकरणामुळं एकच खळबळ उडाली आहे.
Mumbai Local Train: मुंबईच्या लोकल ट्रेनमधील किस्से तर जगजाहिर आहेत. लोकलमधील महिलांची हाणामारी असो किंवा लोकलमध्ये साजरे करण्यात येणारे सण असो. संपूर्ण देशभरात मुंबई लोकलची चर्चा असते. मात्र, मुंबईनजीकच्या ठाण्यात लोकलमध्येच एक भयंकर प्रकार घडला आहे. खचाखच भरलेल्या लोकल ट्रेनमधून एका 17 वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे.
12 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली असून 17 वर्षांची तरुणी बदलापूरहून विक्रोळी येथे जाण्यासाठी तिने लोकल पकडली होती. मात्र, कित्येत तास उलटून गेले तरीही तरुणी घरी पोहोचली नव्हती. तरुणीच्या कुटुंबियांनी तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचा काहीच संपर्क होत नव्हता. तिचा फोनदेखील बंद येत होता. अखेर तिच्या आई-वडिलांनी पोलिसांशी संपर्क करत ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी एकटीच लोकलमधून प्रवास करत होती. मात्र ती अद्याप घरी पोहोचली नाही तिच्यासोबत कोणाता संपर्कही होत नाहीये. कुटुबीयांनी 19 वर्षांच्या मुलावर आरोप करत त्यानेच तिचे अपहरण केल्याची शक्यता वर्तवली आहे. पोलिसांनी लगेचच कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर बेपत्ता तरुणीचा शोध घेण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी मुलाचा मोबाइल नंबर ट्रेसकरुन त्याचे लोकेशन शोधून काढले. लोकेशन शोधून काढल्यानंतर ते ठाण्यापासून 250 किलोमीटर दूर असलेल्या सातारा येथे आढळले. पोलिसदेखील तरुणीचा शोध घेत साताऱ्यात पोहोचले. तरुणाच्या लोकेशनपर्यंत पोहोचताच एका घरातून तो मुलगाच बाहेर येत असल्याचे त्यांनी पाहिलं. तेव्हा पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले.
पोलिसांनी घरात जाऊन पाहिले तेव्हा 17 वर्षांची अल्पवयीन मुलगीदेखील तिथेच होती. पोलिसांनी लगेचच मुलाला अटक केली आहे. त्याचबरोबर मुलीलाही ताब्यात घेत तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे. मुलीच्या म्हणण्यानुसार, मुलाने तिला फूस लावून पळवून आणले होते. तर, मुलाने हे आरोप फेटाळत मुलगी स्वतःहून त्याच्यासोबत आली होती. तर, दोघांच्या मित्रांनी पोलिसांना सांगितले की, दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. या प्रकरणात पोलिस अधिक चौकशी करत आहेत.