`पुन्हा राज ठाकरेंच्या वाट्याला गेलात तर...`, अविनाश जाधवांचा ठाकरे गटाला थेट इशारा
Thane MNS Rada: उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि महत्वाचे नेते रंगायतन सभागृहाच्या दिशेने चालले होते. त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यासमोर बांगड्या, नारळ, टोमॅटो फेकले.
Thane MNS Rada: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील 2 महत्वाचे पक्ष आमनेसामने येताना दिसताय. राज ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यचा प्रयत्न केला. राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकण्यात आल्या. यानंतर राज्यभरातील मनसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली. राज ठाकरेंनीदेखील या प्रकारानंतर संतप्त प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या ठाण्यातील मेळाव्यात याला जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न मनसैनिकांनी केला. यामुळे ठाण्यात मोठा राडा पाहायला मिळाला. या सर्व प्रकारानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाकरे गटाला थेट इशारा दिलाय. राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्यावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या फेकल्या होत्या. याचा प्रचंड राग मनसैनिकांच्या मनात होता. दरम्यान माझ्या नादी लागू नका. तुमच्याकडे प्रस्थापित आहेत, माझ्याकडे विस्थापित आहेत. माझं मोहोळ उठलं तर सभाही होऊ देणार नाहीत, असा इशारा राज ठाकरेंनी ठाकरे गटाला दिला होता. यानंतर मनसे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले. ठाण्यात ठाकरेंच्या मेळाव्यातील संधीचा त्यांनी फायदा घेतला. रात्री साडे आठच्या सुमारास उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि महत्वाचे नेते रंगायतन सभागृहाच्या दिशेने चालले होते. त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यासमोर बांगड्या, नारळ, टोमॅटो फेकले.
काय म्हणाले अविनाश जाधव?
काल मराठवाडा दौऱ्यावेळी पाच सहा शिवसैनिकांनी राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. आज ठाण्यात मनसैनिकांनी त्याला उत्तर दिलंय. उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातील 16-17 गाड्या फोडण्यात आल्या. उद्धव ठाकरेंच्या गाडीवर शेण, बांगड्या फेकण्यात आल्याचे अविनाश जाधवांनी म्हटलंय. ठाण्यात जे झालं ते लाईव्ह सुरु होतं, ते सर्वांनी पाहिलंय. राज ठाकरेंच्या वाट्याला कोणी गेलं तर त्याचं जशासं तसं उत्तर देण्यात येईल, असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला आहे. राज ठाकरेंच्या नादाला लागू नका.आज आम्ही गडकरी रंगायतनपर्यंत पोहोचलोय.उद्या आम्ही तुमच्या घरपर्यंतही येऊ.पुन्हा राज ठाकरेंवर बोलल्यास घरात घुसून मारू असा इशारा अविनाश जाधवांनी ठाकरे गटाला दिलाय. माझ्यासारखे हजारो वेडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करतात. राज ठाकरेंसोबत असं काही करण्याचा विचार जरी त्यांच्या कोणत्या कार्यकर्त्याने केला तरी त्याला घरात घुसून मारु, असे अविनाश जाधव म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात राडा घालणाऱ्यांना राज ठाकरेंचा व्हिडीओ कॉल, मनसे कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
राज यांचा व्हिडीओ कॉल आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात मनसे कार्यकर्त्यांनी राडा घातला. यावेळी ठाकरेंच्या ताफ्यासमोर नारळ, बांगड्या आणि टोमॅटो फेकले. तसेच त्यांच्या ताफ्यावर शेण फेकूनही मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार राडा घातला. यानंतर राडा घालणा-या मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पण राज ठाकरेंचा व्हिडीओ कॉल आल्यानंतर मनसैनिकांमध्ये प्रचंड उत्साहाच वातावरण होतं. त्यांनी मिळून एकच जल्लोष केला. राज ठाकरेंच्या व्हिडीओ कॉलनंतर ठाण्यातील मनसैनिकांचं मनोबल उंचावल्याचं पाहायला मिळालं.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
शिंदेंच्या ठाण्यात मनसेच्या राड्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला. राडा घालणाऱ्या मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.दरम्यान ही अॅक्शनला रिअॅक्शन असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली.
सुषमा अंधारेंनी दिलं आव्हान
ठाण्यातील मनसेच्या राड्यानंतर ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मनसेला खुलं आव्हान दिलं. आपल्या भागात तर कुत्राही वाघ असतो, मात्र 'इलाका तुम्हारा और धमाका हमारा' यात खरी मजा आहे असं खुलं आव्हानच, सुषमा अंधारेंनी मनसेला दिलं. एकनाथ शिंदेंची मदत मिळू शकेल अशा सुरक्षित ठाण्यात मनसे आक्रमक झाली, अशा शब्दांत त्यांनी मनसेला डिवचलं.