आशिष भोईर, झी मीडिया, ठाणे :  पोलिसच ड्रग्जची तस्करी(drug smuggling) करत असल्याचा धक्दाकायक प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे नार्कोटिक्स विभागाने(Thane narcotics department) कारवाई करत या पोलिसांना अटक केली आहे. मागील काही दिवसांपासून पोलिसांनी धडक मोहिमा राबवत ड्रग्ज माफियांची पाळमुळं खिळखिळी केली आहेत. मात्र, आता पोलिसच(railway policemen) ड्रग्ज तस्करीत सहभागी असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीसच अंमली पदार्थांची तस्करी करत असल्याने पोलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे. कल्याणचे दोन रेल्वे पोलीस ड्रग्ज तस्करी करत होते. ड्रग्ज तस्करी करत असतानाच या पोलिसांना ठाणे नार्कोटिक विभागाने रंगे हात अटक केली आहे.


महेश वसेकर आणि रवी भिसे अशी अटक करण्यात आलेल्या दोन रेल्वे पोलिसांची नाव आहेत. यांच्याकडून 925 ग्राम ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.  त्यांनी हे ड्रग्ज  कुठून आणला आणि कोणाला विकण्यासाठी आणलं याचा पोलीस तपास करत आहेत.
कल्याण पश्चिम परिसरात ड्रग्जची विक्री करण्यासाठी दोन तस्कर येणार असल्याची माहिती ठाणे नार्कोटिक्स विभागाला मिळाली होती. हे तस्कर कल्याणहून ठाण्याच्या दिशेने जाणार असल्याची माहिती ठाणे नार्कोटिक्स विभागाला मिळाली होती.


या माहितीच्या आधारे नार्कोटिक्स विभागाने कल्याणच्या दुर्गाडी चौक परिसरात सापळा रचला. त्यानुसार दोन संशयित बाईक स्वारांना या पथकाने अडवलं त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 925 ग्राम ड्रग्ज आढळून आले. हे दोघे रेल्वे पोलीस असल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलीस देखील हैराण झाले. या दोन्ही पोलिसांना सध्या बाजारपेठ पोलिसांच्या स्वाधीन करून त्यांना अटक करण्यात आली आहे.