ठाणेः जिच्यावर प्रेम केले तिलाच संपवले, कारण...; कबड्डीपटूची तिच्याच ट्रेनरने केली हत्या
Thane News: ठाण्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कब्बडीपटुची तिच्याच प्रशिक्षकाने हत्या केल्याची घटना घडली आहे.
Thane News: ठाणे शहरात एक खळबळजनक घटना घडली आहे. शहरात 17 वर्षीय महिला कबड्डी खेळाडुची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीच्या प्रशिक्षकानेच तिची हत्या केल्याचा आरोप करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनरने पहिले महिला खेळाडुचा गळा घोटला नंतर कात्रीने तिच्यावर वार केले. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी प्रशिक्षकाला अटक केली आहे. कापुरबावडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव गणेश गंभीर राव आहे. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशचे तरुणीवर प्रेम होते. मात्र, त्याला संशय होता की तरुणी दुसरं कोणालातरी पसंत करत होती. त्याच संशयातून तो तिच्या घरी गेला आणि त्याने तिची हत्या केली. तरुणीच्या घरी तिची आई व भाऊ दोघच आहेत. हे कुटुंब कोलशेत येथे चाळीच्या घरात राहत होते. ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा ती घरी एकटीच होती. तिची आई व भाऊ काही कारणास्तव बाहेर गेले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 मेच्या सकाळी गणेश तरुणीच्या घरी गेला होता. तेव्हा तिच्या घरी कोणीच नव्हते. गणेश घरी असतानाही ती फोनवर दुसऱ्या कोणाशीतरी खूप वेळ बोलत होती. यावरुनच दोघांमध्ये खूप वाद झाला होता. वाद नंतर इतका वाढला होता की संतापलेल्या गणेशने घरात असलेल्या दोरीने तरुणीचा गळा आवळला. त्यानंतर गणेशने तरुणीच्या गळ्याच्या चारही बाजूने कात्रीने वार केले. गंभीर जखमी झाली होती. त्यातच तिचा मृत्यू झाला. हत्येनंतर गणेशने बाहेरुन दरवाजा बंद करत तिथून फरार झाला.
दुर्गंध आल्यानंतर हत्येची घटना कळली
तरुणीच्या हत्येनंतर घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी घर मालकांना फोन करुन सांगितले. त्यानंतर घर मालक आल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडला तर मुलीचा मृतदेह फरशीवर पडलेला होता. त्यानंतर तातडीने पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. तरुणीचा मृतदेह मुंबईच्या जे.जे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. तेव्हा मुलीचा मृत्यू गळा आवळल्यामुळं आणि गळ्यावर वार करण्यात आल्याने झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर पोलिसांनी तिची आई, भाऊ आणि नातेवाईकांकडे चौकशी केली. त्यावेळी तरुणी तिचा कब्बडी प्रशिक्षक गणेश गंभीररावच्या संपर्कात असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी गणेशला नवी मुंबईच्या घणसोली येथून अटक केले. चौकशीत गणेशने संशयातून तरुणीची हत्या केल्याचे कबुल केले आहे.