ठाणे : बालकांची विक्री करणा-या एका टोळीचा ठाणे पोलिसांनी पर्दाफाश केलाय. काही महिला ठाण्यातील मोडेला चेकनाका इथं एका बालकाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या एका युनिटला मिळाली होती. त्यानुसार सापळा लावला असता एक महिला आणि पुरुष यांनी बाळाला संशयास्पदरित्या बाळगल्याचं आढळलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दोघांची चौकशी केली असता ते उडवाउडवीची उत्तरं देऊ लागले. कसून चौकशी केली असता या बाळाची 1 लाख 35 हजारात मुंबईतल्या एका व्यक्तीला विक्री करणार असल्याची कबुली त्यांनी दिली.


मुंब्रा इथल्या काही जणांनी हे बाळ त्यांना विक्रीसाठी दिलं होतं अशी माहितीही त्यांनी दिली. या माहितीवरुन पोलिसांनी मुंब्रा इथून पाच महिला आणि एका पुरुषाला अटक केलीय. राखी खापरे, हरजिंदर गिल, कावेरी राज दास, नीलम शिरसाट, मोहिनी गायकवाड, जनाबाई खोतकर, मंगल सुपेकर आणि संतोष गायकवाड अशी अटक केलेल्या व्यक्तींची नावे आहेत.


अटकेतल्या आरोपींनी हे बाळ अहमदनगर इथून आणल्याची कबुली दिलीय. बाळाच्या आईनेच हे बाळ तिच्या संमतीने विक्रीसाठी दिले होते अशी माहिती अटकेतल्या महिलांनी पोलिसांनी दिलीय. पोलीस त्या बाळाच्या आईचा शोध घेतायत. दरम्यान, या टोळीने राज्यातील अनेक भागातून बालकांची विक्री केल्याची शक्यता वर्तवली जातेय.