आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : राज्यात पुढील तीन दिवस सर्वत्र वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वत्र जोरदार पावसाचा अंदाज आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरातील कमी दाब्याच्या क्षेत्रांमुळे देशात पावसाचा कालावधी लांबला आहे. यंदा सप्टेंबर महिना संपत आला असला तरी राज्यात पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे परतीचा पाऊस लांबणीवर पडला आहे.


साबणाच्या फेसासारखा पाऊस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय. चंद्रपूरमध्येही सकाळपासूनच पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. पण या ठिकाणी एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. चंद्रपूरमध्ये चक्क साबणाच्या फेसासारखा पाऊस पडला आहे. चंद्रपूर शहराजवळ असलेल्या दुर्गापूर कोळसा खाण परिसरात हा प्रकार उजेडात आली आहे. 



वायूप्रदूषणाचा परिणाम?


झाडांवर-गवतावर-रस्त्यावर अनेक ठिकाणी पुंजक्याच्या स्वरूपातील फेस नजरेस पडला आहे. काही भागात तर या फेस पुंजक्यांचा वर्षाव बघायला मिळाला. सुमारे दिड ते दोन किलोमीटर परिसरात हा फेस पसरला आहे. ज्या भागात फेस पडला त्या भागात चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र आणि अनेक कोळसा खाणी आहेत. औष्णिक वीज केंद्र आणि कोळसा खाणीतून निघणाऱ्या वायूप्रदूषणाचा पावसाच्या पाण्याशी संपर्क आल्याने हा फेस तयार झाल्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.