देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : मुंबई लोकल ही मुंबईची लाईफ लाईन मानली जाते. लाखो मुंबईकर रोज या लोकलने प्रवास करत असतात. मुंबईकरांचे जगणं हे लोकलवरच निर्भर आहे. मुंबई लोकल वेळेत नसेल तर मुंबईकरांचे सगळं गणितच बिघडून जातं. ही मुंबई लोकल सुरळीत ठेवण्यासाठी हजारो हात सतत कार्यरत असतात. मग दर रविवारी मेगाब्लॉक घेतल्यानंतर त्यावर काम करणारे ट्रॅकमॅन असतील किंवा रेल्वे स्थानकावर काम करणारे उद घोषक असतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हजारो लाखो लोकांना त्यांच्या गंतव्य स्थानापर्यंत वेळेत पोहोचवणारे रेल्वेचे कर्मचारी हे प्रवाशांसाठी जणू देवदूतच असतात. जर काही मिनिटासाठी मुंबई लोकल उशिरा झाली आणि जर उद्घोषणा होत नसतील तर प्रवाशांची चांगलीच चिडचिड होते. प्रसंगी प्रवाशांची चिडचिड सहन करतही काम करणारे उद्घोषक असतात.


ही लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर येईल... ही लोकल या कारणास्तव दहा ते पंधरा मिनिटे उशिरा धावत आहे... हा आवाज जणू लोकल प्रवाशांसाठी जीवनाचा एक अविभाज्य भागच झालाय हा आवाज कानावर न ऐकलेला आणि या आवाजाच्या दिशेने लोकल पकडण्यासाठी गडबड न केलेला एकही मुंबईकर सापडणार नाही. मात्र सध्या या आवाजाचीच गळचेपी सुरू आहे. आर्थिक चणचणीचा सामना या आवाजामागे कार्यरत असणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे.


उद्घोषक असणारे अनेक कर्मचारी हे कंत्राटी कर्मचारी आहेत मध्य रेल्वे ,हार्बर रेल्वे वर हे कर्मचारी सातत्याने कार्यरत आहेत मात्र ठेकेदार बदलल्यामुळे मागील ठेकेदारापेक्षा सात ते आठ हजाराने कमी पगार या कर्मचाऱ्यांना मिळतोय शिवाय इतरही अनेक अडचणींचा सामना या कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे.कामाच्या वाढीव वेळा, बोनस चा मुद्दा, या अडचणी बद्दल आवाज उठवल्यानंतर बडतर्फीची भीती अशा मनस्थितीत सध्या हे कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत.


या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबद्दल आझाद कामगार संघटनेने आवाज उचलला आहे.रेल्वे प्रशासनाकडे याबाबत पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. शिवाय न्यायालयाचा दरवाजाही आझाद कामगार संघटनेच्या वतीने तुटवण्यात येणार आहे."उद्घोषक असणाऱ्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा नवनियुक्त कंत्राटदारा मार्फत शारीरिक,मानसिक आणि आर्थिक छळ सुरू आहे आणि या सगळ्याकडे रेल्वे प्रशासनाचेही दुर्लक्ष आहे त्यामुळेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या या प्रश्नासंदर्भात आम्ही आवाज बुलंद करणार आहोत" अशी प्रतिक्रिया आझाद कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी दिली आहे.