पुणे : जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ला पर्यटकांना नेहमीच आपल्या दिशेनं खुणावत असतो. आज रविवारची सुट्टी असल्यानं अनेक पर्यटकांनी शिवनेरीवर आपला मोर्चा वळविला होता. त्यामुळे शिवनेरी किल्ल्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे जसे शत्रूला घेरत अगदी तसेच आग्या मोळाच्या मधमाशांनी त्या पर्यटकांना घेरलं. काही कळण्याआधीच त्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. त्या मधमाशांच्या चाव्याने अनेक पर्यटक जखमी झाले.


 



स्थानिक नागरिकांच्या मदतीने या सर्व जखमी पर्यटकांना जुन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील जे काही पर्यटक किरकोळ जखमी झाले त्यांनी आपल्या वाहनातून आपापले गाव गाठले. तर, काही पर्यटक गडावरच अडकले. 


शिवनेरी किल्यावर सुमारे 250 हुन अधिक पर्यटक आज आले होते. यापैकी कुणीतरी मधमाशांच्या पोळ्यावर दगड भिरकावला. त्यामुळे त्या आग्या मोलाच्या माशा चिडल्या आणि त्यांनी गडावर असलेल्या पर्यटकांच्या दिशेने झेपावत त्यांचे चावे घेतले. कुण्या एका पर्यटकाच्या चुकीची मधमाशांनी सर्वांचा चावा घेऊन परतफेड केली.