पाण्यासाठी श्रमदान करणाऱ्या गावांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी
दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाणी फाऊंडेशन आणि इतर संस्थांच्या माध्यमतून जलसंधारणाची कामे केली जात आहेत.
सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाणी फाऊंडेशन आणि इतर संस्थांच्या माध्यमतून जलसंधारणाची कामे केली जात आहेत. या कामामुळे 500 फूट खोल पातळीवरही ज्या ठिकाणी पाणी लागत नाही, त्या क्षेत्रात अगदी 10 फूटावर पाणी लागले आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी कमालीची वाढल्याने, आता ग्रामस्थ जलसंधारणाच्या कामासाठी दुप्पट जोमाने कामाला लागले आहेत. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील वडेपुरी गावाला हे यश लाभलं आहे.
गावात अनेक वर्षापासून पाणी टंचाई होती. उन्हाळ्यात पाण्याचा कुठलाही स्त्रोत शिल्लक राहायचा नाही. पाण्याची पातळी 500 फूटखोल गेली होती.
टँकरशिवाय पाण्यासाठी पर्याय नव्हता. तेव्हा गतवर्षी वडेपुरी गावाने वाटर कप स्पर्धेत सहभाग घेतला. ठरवून दिलेल्या कामापैकी फक्त 30 % काम गेल्या वर्षी झालं. तरीही यावर्षी पाण्याची पातळी वाढली.
यावर्षी नाला खोलीकरणाचे काम करत असतांना केवळ 10 फुटावर पाण्याचे झरे लागले. ऐन उन्हाळ्यात 10 फुटावर पाणी लागल्याने कामाचे चिज झाल्याचा आनंद ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला आहे.
वडेपुरीला मागच्या वर्षी दररोज दोन टँकरने पाणी पुरवठा करावा लागत होता. उन्हाळ्यात विहिरी आणी बोअर आटत असल्याने चार - चार किलो मीटर अंतरावरून पाणी आणावं लागत होतं. मागच्या वर्षी केलेल्या थोड्याशा कामामुळे गाव टँकर मुक्त झाले.
पाणी पातळी देखील वाढल्याने , यंदा गावकऱ्यांचा उत्साह देखील वाढला आहे. आता गावाला दुष्काळ मुक्त करण्याचा चंगच या गावकऱ्यांनी बांधला असून संपूर्ण गाव श्रमदानाच्या कामाला लागलं आहे.
वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून वडेपुरी येथील गावकऱ्यांनी आपलं गाव टंचाई मुक्त केलं. आता गावकऱ्यांना दुष्काळ मुक्त गाव करायचं आहे. त्यासाठी गावकरी रात्रंन दिवस श्रमदान करत आहेत.