सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : तुम्हाला शिकवणारे शिक्षक बोगस असू शकतात, त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. पुणे पोलिसांच्या हाती टीईटी घोटाळ्यातील 7 हजार 900 शिक्षकांचे सारे कच्चे चिठ्ठे हाती लागले आहेत. आता पोलिसांनी या शिक्षकांवर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सुरू केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीईटी घोटाळ्यात याआधीच परीक्षा परिषदेच्या अध्यक्षासह शिक्षण विभागातल्या बड्या धेंडांना बेड्या ठोकण्यात आल्यात आहेत. जीए सॉफ्टवेअर कपंनीचा संस्थापक आणि गणेशन यालाही पोलिसांनी आता चौकशीसाठी बोलावलंय. त्यामुळे अजून धागेदोर उलगडण्याची शक्यात आहे. 


आता ज्यांनी पास होण्यासाठी पैसे दिले आणि बोगस डिग्री मिळवली त्या 7 हजार 900 शिक्षकांची यादी पोलिसांनी तयार केलीय. हा घोटाळा नेमका कसा सुरू होता ते पाहूयात.


टीईटी परीक्षेत पात्र ठरवण्यासाठी काहींच्या थेट OMR शीट बदलण्यात आल्या. तर काहींच्या OMR शीट स्कॅन झाल्यानंतर त्यावरील नंबर बदलण्यात आले. ओएमआर शीटमध्ये 28 मार्क असताना अंतिम निकालात चक्क 82 मार्क दिल्याचं उघडकीस आलंय. 


प्रश्नपत्रिका सोडवताना या शिक्षकांना एक कोडवर्ड देण्यात आला होता. तसंच त्यांनी काही प्रश्नांचीच उत्तरं सोडवावीत असं ठरलं होतं. त्यानंतर त्यांच्या मूळ गुणांमध्ये वाढ करून त्यांना पात्र ठरवण्यात आलं. तर काहींच्या जातीची वर्गवारी बदलून त्यांना पास करण्याचा कारनामा केला. एवढं करूनही पात्र ठरत नसेल तर थेट बोगस सर्टिफिकेटच देऊन त्यांना पात्र ठरवण्यात आलं. 



या सर्व मोडस ऑपरेंडीवरून टीईटी घोटाळ्याची व्याप्ती किती मोठी आहे हे यातून स्पष्ट होतंय...


या तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलीय. परीक्षा न देताही अनेकांना पात्र ठरवण्यात आल्याचं उघड झालंय. तब्बल दीडशे ते दोनशे जणांना ओरिजिनल सर्टिफिकेट्स विकण्यात आल्याचा पुणे सायबर पोलिसांनी पर्दाफाश केलाय. 


ही सर्व सर्टिफिकेट्स सील करण्यात आली आहेत. घोटाळेबाजांनी गेल्या काही वर्षांपासून सर्वांना चकवा दिला. मात्र अखेर पोलिसांनी या गुन्ह्याची पाळंमुळं शोधून काढल्यानं बोगस शिक्षकांचा लवकरच पर्दाफाश होणार आहे.