Onion Export Ban : कांदा उत्पादक शेतक-यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी दिली. मात्र याबाबतचं नोटिफिकेशन अद्याप जारी करण्यात आलेलं नाही. शेतकऱ्यांना काहीसा दिसाला मिळाला असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना किती प्रमाणात कांदा निर्यात करता येईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कांद्यावरील निर्यात बंदी उठवली असली तरी नोटीफिकेशन जारी करण्यात आलेले नाही.  नोटिफिकेशन जारी झाल्यानंतर किती प्रमाण कांदा निर्यातीला मंजुरी देण्यात आलीय याबाबत स्पष्टता येईल असंही भारती पवार यांनी सांगितले. तर, सरकारने कांद्यावरील बंदी उठवण्यास खूप उशीर केला असा टोला राष्ट्रवादी पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी लगावला आहे.


भारती पवार यांची प्रतिक्रिया


केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी हटवल्यानंतर केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान मोदी कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतात.  त्यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा केला. अमित शाह यांच्यासोबत आज मीटिंग झाली होती त्यानंतर कांदा निर्यात खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला.  हा शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेला मोठा निर्णय आहे. इतर देशात कांद्याची मागणी आहे त्यामुळं निर्यात झाली की त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल.  जिथे शेतकरी अडचणीत असेल तिथं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असेल असं केंद्रीय मंत्री भारती पवार म्हणाल्या. 


7 डिसेंबर रोजी घेतला होता कांदा निर्यात बंदीचा निर्णय


डिसेंबर महिन्यात कांद्याचे बाजार भाव 4 हजार रुपयांच्या वरती गेल्याने बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने 7 डिसेंबर रोजी कांद्याची निर्यात बंदी केली होती.  कांद्याचे बाजार भाव 800 ते 1000 रुपये पर्यंत कोसळल्याने कांदा निर्यात बंदी हटवावी  यासाठी व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांनी जोरदार मागणी केल्यानंतर अखेर सव्वा दोन महिन्यानंतर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांना दिलासा देणारी घोषणा केली आहे.  तीन लाख मॅट्रिक टनापर्यंत कांदा निर्यातीला परवानगी दिली असून बांगलादेश येथे पन्नास हजार मॅट्रिक टन तर इतर देशांमध्ये अडीच लाख मॅट्रिक टन कांदा निर्यात करता येईल. मात्र, औषधी म्हणून समजला जाणारा सफेद कांदा आणि रोजच्या आहारात लागणारा लाल कांदा आणि कोणत्या राज्यातून किती कांदा निर्यात केला जाणार याबाबत आदेश न निघाल्यामुळे अस्पष्टता आहे कांद्याचे काय बाजार भाव निघता याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. तातडीने कांदा निर्यात बंदी खुली करण्याचा आदेश काढावा आणि संपूर्ण कांद्याची निर्यात बंदी खोली करावी अशी मागणी शेतकऱ्यांसह व्यापारी करत आहे.