कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा कोल्हापूर दौरा एकाच दिवशी. एवढंच नव्हे, तर दोघांच्या पत्रकार परिषदेच्या वेळाही जवळपास एकच. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक मुद्दाम एकमेकांच्या पायात पाय घालतायत का, अशी शंका येत होती. मात्र घडलं काही वेगळंच, महाराष्ट्राला सुखद धक्का देणारं. सुसंस्कृत राजकारणाचं दर्शन घडवणारं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांना देवेंद्र फडणवीसही त्याच भागात पाहणी करत असल्याची माहिती मिळाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांना शाहुपूरीतच थांबण्याचा निरोप पाठवला. फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान दिला. आणि या दोन्ही आजी-मुख्यमंत्र्यांची भेट झाली. 


यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, शिवसेना खासदार धैर्यशील माने, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर होते. तर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील होते. 


मुख्यमंत्री आल्यानंतर सर्वांनी एकत्रितपणे नागरिकांची कैफियत ऐकून घेतली. मुख्यमंत्री ठाकरे, सतेज पाटील आणि फडणवीस, दरेकर, चंद्रकांत पाटील यांच्यात काही काळ चर्चाही झाली. 


या भेटीबद्दल सांगताना 'देवेंद्र फडणवीस यांना मीच सांगितलं की थांबा तिथे मी देखील त्याच ठिकाणी येतो. हे काय मी बंद खोलीमध्ये बोललो नाही, मुंबईत एकत्र बसून तोडगा काढण्यावर चर्चा झाली. तीन पक्ष सोबत आहेत, चौथा आला तर तोडगा काढण्यास काहीच अडचण येणार नाही, अस मुख्यमंत्री म्हणाले.


तर देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'आमची तिथं एवढीच चर्चा झाली की, या परिस्थीवर काहीतरी कायमस्वरूपी उपाय झाला पाहिजे. तातडीची मदत तर तात्काळ दिलीच पाहिजे पण अशा घटना वारंवार घडत आहेत, त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना त्यावर काय होऊ शकेल? हा प्रयत्न केला गेला पाहिजे. तसंच, मी त्यांना सांगतिलं की त्यांनी जर बैठक बोलावली तर आम्ही यायला तयार आहोत.'


इतकचं नाही तर पत्रकार परिषदेच्या वेळाही बदलण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांचं बोलून होईपर्यंत देवेंद्र फडणवीस थांबून राहिले. या घटनेनं महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा पुन्हा एकदा प्रत्यय दिलाय. विरुद्ध विचारसरणीतल्या दोन नेत्यांमधील मैत्रीची अनेक उदाहरणं महाराष्ट्रानं बघितली आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांमधील मैत्री असो वा विलासराव देशमुख आणि गोपिनाथ मुंडे यांच्यामधला जिव्हाळा. राज्यातल्या नेत्यांनी हीच राजकीय परंपरा जपली आहे. हीच परंपरा महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला पुढे घेऊन जाईल आणि पुरग्रस्तांच्या जखमांवर फुंकरही घालेल यात शंका नाही.