CM Eknath Shinde : स्वच्छता हा आरोग्याचा मूलमंत्र आहे. याच भावनेने बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण स्‍वच्‍छता मोहीम अर्थात डीप क्लिनिंग ड्राइव्ह सुरु केली आहे. त्याद्वारे मुंबई स्वच्छ, सुंदर आणि निरोगी होत आहे. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचा एकूणच स्‍वच्‍छता पॅटर्न यशस्‍वी होत असून हा पॅटर्न राज्यातील सर्व शहरांमध्ये राबविला जाईल, अशी घोषणा राज्याचे मुख्‍यमंत्री . एकनाथ शिंदे यांनी केली. मुंबई महानगरातील सर्व रस्‍ते काँक्रिटकरणाचे होवून ते खड्डेविरहीत होतील, त्या दिशेने कामे सुरु आहेत, असेही मुख्‍यमंत्री महोदयांनी नमूद केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्‍याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री शदीपक केसरकर, कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री  मंगल प्रभात लोढा, आमदार  यामिनी यशवंत जाधव, आमदार  कालिदास कोळंबकर, आमदार  मनीषा कायंदे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष  यशवंत जाधव, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ.  अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उप आयुक्त (परिमंडळ २) . रमाकांत बिरादार यांच्यासह संबंधित अधिकारी तसेच इतर मान्यवर यानिमित्ताने उपस्थित होते.


बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या दोन परिमंडळ मिळून तीन प्रशासकीय विभाग अर्थात तीन वॉर्डांमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी स्वच्छता मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेतला. परिमंडळ २ मध्‍ये जी दक्षिण आणि एफ दक्षिण, परिमंडळ १ मध्‍ये ई विभागातील मोहिमेत सहभाग नोंदवतानाच स्वच्छतेच्या कामांची मुख्यमंत्री शिंदे यांनी पाहणी केली. तसेच, ठिकठिकाणी स्‍वच्‍छता कर्मचारी, शालेय विदयार्थी आणि स्थानिक नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. विविध मंदिरांना भेटी देत दर्शनही घेतले. मोहिमेत सहभागी झालेल्‍या वारक-यांचेही त्‍यांनी आभार मानले. स्वच्छतेचे संदेश झळकावणाऱया, तसेच स्वच्छता विषयक घोषणा देणाऱया विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना देखील मुख्यमंत्री महोदयांनी प्रोत्साहित केले.


जी दक्षिण विभागातील वरळी नाका येथील संतदर्शन शिल्‍पाचे लोकार्पण करून मुख्यमंत्री महोदयांनी दौ-याचा प्रारंभ केला. त्यानंतर अॅनी बेझंट मार्गावरील डॉ. हेडगेवार चौकात स्वच्छतेची पाहणी केली. वरळी नाका येथील आचार्य प्रल्‍हाद केशव अत्रे चौकातील रस्‍ता जेट स्प्रेच्या सहाय्याने पाणी फवारणी करुन स्वच्छ केला. आचार्य प्रल्‍हाद केशव अत्रे यांचा पुतळा, चौथ-याची देखील त्यांनी पाणी फवारणी करून स्‍चच्‍छता त्‍यांनी केली. डॉ. ई. मोझेस मार्गावरील जिजामाता नगर, माता रमाई चौक येथे स्‍वच्‍छतेची पाहणी करत महानगरपालिका प्रशासनास आवश्यक त्या सूचनाही केल्‍या. रस्ते, पदपथ, सार्वजनिक भिंती यांच्यासह मुंबईतील बेस्ट बसेससाठी असणारे सर्व बस थांबे देखील स्वच्छ करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. 


मुंबई सेंट्रल येथे राज्य परिवहन महामंडळाच्या मुख्य आगाराबाहेर सुरु असलेली पदपथ रंगरंगोटी, रस्ते स्वच्छता यांची देखील मुख्यमंत्री महोदयांनी पाहणी केली. स्थानिक नागरिकांना वाहतूक, वाहनतळ याविषयी भेडसावत असलेल्या समस्या जाणून घेतल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी थेट उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱयांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधत समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश दिले.


ई विभागातील माझगाव येथील महाराणा प्रताप चौकास भेट दिल्यानंतर प्रारंभी मुख्‍यमंत्री महोदयांनी महाराणा प्रताप यांच्‍या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर, चौकातील रस्‍ते स्‍वच्‍छता केली. तसेच, स्वतः पाईप हाती घेत जेट स्प्रेच्या सहाय्याने रस्ता पाण्याने धुतला. याप्रसंगी स्थानिक जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. या ठिकाणी जमलेल्‍या नवाब टँक महानगरपालिका शाळेच्या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री महोदयांनी हस्तांदोलन केले. स्वच्छता जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी झळकावलेले संदेश पाहून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले.


दौ-याच्‍या अखेरीस,  एफ दक्षिण विभागातील नायगाव येथे एस. एस. वाघ मार्गावरील महात्‍मा गांधी चौकात पदपथ जेट स्प्रेच्या सहाय्याने पाण्याने धुवून धूळमुक्त करण्यात आला. यानंतर स्वच्छता कामांची पाहणी करताना तेथेही रस्ते स्वच्छता करुन, स्थानिक नागरिकांशी संवाद साधून दौऱयाची सांगता झाली. 


दौऱयाच्या निमित्ताने स्वच्छता मोहिमेत सहभागी नागरिकांना संबोधित करताना मुख्‍यमंत्री शिंदे म्‍हणाले की, स्वच्छ, सुंदर, निरोगी आणि प्रदूषणमुक्‍त मुंबईसाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण स्‍वच्‍छता मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम केवळ मुख्‍यमंत्री, पालकमंत्री किंवा बृहन्‍मुंबई महानगरपालिकेची राहिलेली नाही. आता मुंबईकर नागरिक, शालेय विद्यार्थी, स्‍वयंसेवी संस्‍था या मोहिमेत मोठया संख्‍येने सहभागी होत आहेत. स्‍वच्‍छतेची चळवळ आता लोकचळवळीमध्ये रुपांतरित होवून यशस्‍वी होताना आढळते आहे. या मोहिमेमुळे वायू प्रदूषण कमी होवून मुंबई प्रदूषणमुक्‍त करण्यास मदत होणार आहे. पर्यायाने, नागरिकांचे आरोग्य सुधारेल. लोकं सदृढ, निरोगी राहतील, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री महोदयांनी व्यक्त केली.


पुढे ते म्हणाले की, मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. देश – विदेशातूनच नव्‍हे तर जगभरातून लोक मुंबईत येतात. मुंबई जशी त्यांना अपेक्षित आहे, तशीच मुंबई साकारण्याचे शासनाचे ध्येय आहे. येत्या दोन-अडीच वर्षात मुंबईतील सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे होवून मुंबईतील रस्त्यांवरुन खड्डेविरहीत प्रवास व्हावा, या दिशेने कामे सुरु आहेत. मुंबई महानगरात विविध ठिकाणी सुशोभीकरणाची कामे सुरु आहेत. रस्ते दुभाजकांमध्ये तसेच चौक, वाहतूक बेटं आणि शक्य असेल त्या मोकळ्या जागांवर रोपं, झाडे लागवड करणे, हिरवळ फुलवणे, हरित पट्टे व नागरी वने तयार करून पर्यावरण पूरक वातावरण तयार करणे, अशा चौफेर पद्धतीने महानगरपालिकेच्या माध्यमातून कामकाज सुरु आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.


स्‍वच्‍छता कर्मचारी हे मुंबईचे खरे नायक अर्थात हिरो असल्‍याचा पुनरूच्‍चार करत मुख्‍यमंत्री महोदय म्‍हणाले की, मुंबई स्वच्छ, सुंदर ठेवण्‍याचे काम स्‍वच्‍छता कर्मचारी करतात. स्वच्छता कर्मचा-यांच्या वसाहतीमधील सोयी-सुविधांच्या समस्या तसेच त्यांच्या निवासस्‍थानांचा प्रश्‍न मार्गी लावला जात आहे. कामगारांच्या वसाहतींमध्‍ये आवश्यक सर्व सोयी-सुविधा पुरवल्या जात आहेत. त्‍यांच्‍या अडीअडचणी सोडविण्‍यास सर्वोच्‍च प्राधान्‍य दिले जात आहे.स्‍वच्‍छता कर्मचाऱयांच्‍या तसेच एकूणच महानगरपालिकेच्या सर्वच कर्मचा़रंयाचा गटविम्‍याचा प्रश्‍न व्यक्तिशः लक्ष घालून हाती घेतला आहे. नागरिक मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडतात, त्या आधी शक्य तेवढी स्वच्छतेची कामे पूर्ण व्हावीत, यासाठी प्रयत्न सुरु असून त्यामध्ये स्वच्छता कर्मचाऱयांचे योगदान सर्वाधिक मोलाचे आहे. मुंबईकरांना अपेक्षित असलेली सर्वांगीण स्‍वच्‍छतेची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेरीस नमूद केले.