Thane Ghodbunder Fort : महाराष्ट्रातील गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचे साक्षिदार आहेत. येणाऱ्य़ा पिढीला इतिहास प्रत्यक्षात अनुभवता यावा यासाठी गड किल्ल्यांचे संवर्धन करावे अशी मागणी शिवप्रेमींकडून केली जात आहे. अशातच ठाण्यात एक संतापजनक प्रकार घडला आहे. ठाण्यातील 500 वर्ष जुना घोडबंदर किल्ला भाड्याने देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यामुळे शिवप्रेमी संतापले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर येथील घोडबंदर किल्ला भाड्याने देण्याचा वादग्रस्त ठराव मांडण्यात आला. मिरा भाईंदर नगरपालिकेने चक्क घोडबंदरचा ऐतिहासिक किल्ला भाडे तत्वावर देण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला होता. महापालिकेच्या वास्तूंना भाडेतत्त्वावर देऊन पालिकेचे उत्पन्न वाढवण्याचा ठराव पालिकेने 9 जुलै रोजी केला केला होता. मात्र ही उघडकीस आल्याने 25 जुलै रोजी सुधारित ठराव करून त्यातील घोडबंदर किल्ल्याचे नाव वगळण्यात आले आहे.  याबाबत पालिका आयुक्तांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही.. 


मात्र शिवप्रेमींनी यात हस्तक्षेप केल्यानंतर नगरपालिकेनं आपला ठराव मागे घेतला. मीरा भाईंदर नगरपालिकेने राज्य सरकारकडून हा किल्ला देखभालीसाठी आपल्या ताब्यात घेतला होता. मात्र, पाचशे वर्षांचा इतिहास असलेला हा  किल्ला थेट भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय नगरपालिकेनं घेतल्यानं संताप व्यक्त करण्यात आला. या प्रकरणी शिवसेनेनं पालिका आयुक्तांची भेट घेऊन निषेध व्यक्त केला. 


घोडबंदर किल्ल्याचा इतिहास


घोडबंदर किल्ला हा ठाण्यातील घोडबंदर गावाजवळ उल्हास नदीच्या दक्षिण बाजूला आहे.  घोडबंदर किल्ल्याला इतिहास पाचशे वर्षांचा  आहे. 1520 नंतर पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला. याच किल्याच्या बंदरावरुन अरब व्यापारी घोड्यांचा व्यवसाय करायचे असे सांगितले जाते. 1739 साली मराठ्यांनी वसईच्या मोहिमेत हा किल्ला जिंकला. अनेक वर्ष या किल्ल्यावर मराठ्यांचे साम्राज्य होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवरून परतताना किल्ल्याची पाहणी केल्याचे इतिहासकार सांगतात.