प्रशांत शर्मा, झी मीडिया, शिर्डी : शिर्डीतल्या पिंपळवाडीत कावळ्यामुळे शेळके वस्तीवरील लोक हैराण झाले आहेत. इथल्या एका झाडावर कावळ्यानं घरटं बांधलं होतं. मात्र जोरदार वाऱ्याने घरटं पडलं. दोन पिल्लं जमिनीवर पडली. त्यातलं एक पिल्लू मेलं, तर दुसरं जखमी झालं. या जखमी पिल्लाच्या रक्षणासाठी कावळे सतत पहारा देत आहेत. जो कुणी पिल्लांजवळ येईल त्याला टोचा मारून कावळे जखमी करतायत. पिल्लांच्या मदतीसाठी जाणाऱ्यांनाही कावळे सळो की पळो करून सोडतायत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या पाच सहा दिवसांपासून इथं अशी अघोषित संचारबंदी सुरू आहे. जखमी पिल्लाला पाणी पाजणं, भात खाऊ घालणं, अशी माणुसकी शेळके कुटुंबियांनी दाखवली. पण तरीही कावळ्यांचा उपद्रव सुरूच आहे. केवळ माणसांनाच नव्हे तर कुत्री, मांजरी यांनाही कावळे टोचत आहेत.


कावळ्यांच्या कर्कश काव कावनं सगळेच कावले आहेत. स्वसंरक्षणासाठी काठ्या हातात घेऊन घराबाहेर पडावं लागतंय. पण पिल्लासाठी कावळ्यांचं प्रेम पाहून सगळ्यांनाच गहिवरून देखील येतंय. हे जखमी पिल्लू पुन्हा कधी भरारी घेतंय, याची उत्सूकता सगळ्यांनाच आहे.