मालेगाव : बाजार समितीमध्ये शेतक-याला हमालाकडून मारहाणीचा निषेध करण्यासाठी संतप्त शेतक-यांनी लिलाव बंद पाडले. बाजार समितीत शेतक-यांनी विक्रीसाठी आणलेला शेतमाल हमालांकडून दमदाटी करुन काढून घेतला जातो. त्याला विरोध करणा-या शेतक-याला बाहेरच्या गुंडाकरवी दमदाटी करण्यात येते. त्यामुळे शेतक-यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


विजय दौलत पवार यांनी मालेगाव बाजार समितीमध्ये टरबूज विक्रीसाठी आणले होते. त्यावेळी हमालांनी दमदाटी करुन टरबूज त्यांच्याकडून काढून घेतले. त्यास विरोध करणा-या या शेतकऱ्याला हमालाने शिवीगाळ करत मारहाण केली. दरम्यान मालेगाव बाजार समितीमध्ये हमालांकडून शेतकऱ्यांना दमदाटी आणि मारहाणीचे प्रकार नित्याचेच झालेत. यावर बाजार समितीचे कोणतंही नियंत्रण नसल्याने शेतक-यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हमालांवर जोवर कारवाई होत नाही तोवर लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय शेतक-यांनी घेतला आहे. त्यामुळे येथे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.