वडिलांनी मटण खाऊ दिलं नाही, मुलाने केलेल्या कृत्याने सातारा हादरलं
वडिलांनी मटण खाऊ दिलं नाही, मुलाने केलेल्या कृत्याने सातारा हादरलं
सातारा : साताऱ्यातील कासारवाडी इथं एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मटण का खायला घालत नाही असं विचारत संतापलेल्या मुलाने वडिलांची कुऱ्हाडीने वार करत हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
कासारवाडी इथल्या भंडारदारा मळवी शिवारात पांडुरंग सस्ते हे आपल्या कुटुंबियांसह रहातात. शनिवारी संध्याकाळी त्यांचा छोटा मुलगा नटराज रस्ते (वय 29) याने मटण आणण्यास सांगितलं. पण पांडुरंग सस्ते यांनी नकार दिला. यावरुन नटराजने वडिलांशी वाद घालायला सुरुवात केली. तुम्ही मला मटण का खायला घालत नाही, असा जाब त्याने वडिलांना विचारला.
हा वाद इतका टोकाला गेला की संतापलेल्या नटराजने थेट कुऱ्हाडीने वडिलांवर हल्ला केला. काही कळण्याच्या आतच नटराजने वडिलांच्या डोक्यात आणि मानेवर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात पांडुरंग सस्ते यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पांडुरंग यांच्या पत्नीने आपल्या मुलाविरोधात दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी नटराजला अटक केली.