गृहमंत्र्यांनी दिली बैलगाडा मालकांसाठी ही आनंदाची बातमी
माझा हा बळीराजा शेतात काबाडकष्ट करून मेहनत करतो. या मुक्या प्राण्यांचा सांभाळ करतोय.
हेमंत चापुडे, झी मिडिया, मंचर : माझा हा बळीराजा शेतात काबाडकष्ट करून मेहनत करतो. या मुक्या प्राण्यांचा सांभाळ करतोय. त्यामुळे बैलगाडा मालकांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या, असे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.
पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील थापलिंग बैलगाडा घाटात मालकांशी बोलताना दिलीप वळसे पाटील यांनी एक महत्वाची एक घोषणाही केलीय. राज्यात बैलगाडा मालकांवर मागच्या काळात गुन्हे दाखल झाले होते. हे दाखल झालेले गुन्हे लवकरच मागे घेतले जाणार आहे. यासंबंधीच्या सूचना पोलीस प्रशासनाला दिल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील सर्व पोलीस अधीक्षकांना बैलगाडा मालकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासंबंधीच्या कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. माझ्या बैलगाडा मालकांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी पोलीस प्रशासनाने घ्यावी, असेही ते म्हणाले.
किरीट सोमय्यांना प्रत्युत्तर
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना गुन्हा दाखल करून दाखवा असे चॅलेंज दापोली येथे दिले होते. यावर त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'गृहमंत्री कोणावर गुन्हे दाखल करत नाही, गुन्हे हे पोलीस दाखल करत असतात' अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय.