चारही पायांनी निकामी झालेला बिबट्या अखेर चालू लागला
बिबट्या पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त संचार करायला लागला आहे.
हेमंत चापुडे, झी मीडिया, पुणे : घनदाट जंगलामध्ये रुबाबदारपणे फिरणारा बिबट्या आता शिकारीच्या शोधात लोकवस्तीत वास्तव्य करू लागला आहे. अशातच बिबट्याचे लोकवस्तीत वास्तव्य वाढत असताना बिबट्या आणि मनुष्य यांच्यात एक वेगळा संघर्ष सुरू झाला. या संघर्षातून बिबट संकटात सापडत चालला आहे. त्याच्या मदतीला 'माणिकडोह बिबट्या निवारा केंद्र' पुढे येऊन बिबट्याच्या आरोग्याची काळजी घेत आहे. अपघातात चारही पाय निकामी असताना उपचारानंतर बिबट्या पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त संचार करायला लागला आहे.
माणिकडोह बिबट्या निवारा केंद्राच्या संपूर्ण टीमने या बिबट्याची तीन महिने अगदी डॉक्टर आणि रूग्ण या नात्यातून सेवा केली आहे. तीन महिन्यानंतर हा बिबट शारीरिक दृष्ट्या सक्षम झाला आहे.
जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इगतपुरी येथे महामार्गावर पाच महिन्याच्या बिबटचा अपघात झाला होता. अपघाता बिबटचे चारही पाय निकामी झाले होते. त्यानंतर या बिबट्यावर माणिकडोह बिबट निवारा केंद्रात उपचार सुरु करण्यात आले.