पुण्यातील कोरोना नियंत्रणासाठी अशी यंत्रणा काम करणार, मुख्यमंत्री देणार भेट
पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी यापुढच्या काळात संपूर्ण यंत्रणा एकाच सेंट्रल कमांडच्या निर्देशानुसार काम करेल.
मुंबई : पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी यापुढच्या काळात संपूर्ण यंत्रणा एकाच सेंट्रल कमांडच्या निर्देशानुसार काम करेल. कटेंन्मेंट भागात घरोघरी जावून मर्यादित कालावधीत तपासणी पूर्ण केली जाईल. रुग्णांचा शोध घेऊन त्याचं सुरक्षित अलगीकरण, विलगीकरण केलं जाईल. कोरोना प्रसार रोखण्यासाठी जनजागृती करुन लोकसहभाग वाढवण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन दिवसात पुण्याला भेट देणार आहेत.
विभागीय आयुक्तांसह जिल्ह्याधिकारी, महापालिका आयुक्तांसह प्रमुख अधिकारी नियमित पत्रकार परिषद घेऊन नागरिकांशी संवाद साधतील. नागरिकांना, लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन कोरोनाविरुद्धची लढाई एकजुटीनं लढली जाईल आणि आम्ही पुणेकर कोरोनाविरुद्धची ही लढाई नक्की जिंकू, असा विश्वास अजित पवार यांनी मंत्रालयात आयोजित विशेष बैठकीत व्यक्त केला.
पुणे शहर, जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती, उपाययोजनांसंदर्भात केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते. अजित पवार यांनी यावेळी म्हणाले की, पुण्यात ‘कोरोना’च्या चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्यामुळेच रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. पुण्यातील स्थिती नियंत्रणात आहे.
पुण्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्याचा मुद्दा राज्य शासनाने गांभीर्याने घेतला असून जिल्ह्यातील सर्व यंत्रणां युद्धपातळीवर कामाला लागल्या आहेत. खुद्द मुख्यमंत्री दोन दिवसात पुण्याला भेट देणार आहेत. त्यांच्या भेटीमुळे या लढाईला निश्चित बळ मिळेल. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी पुणे जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थिती आणि उपाययोजनांसंदर्भात माहिती सादर केली.
पुणे जिल्ह्यात तीन जम्बो कोविड रुग्णालये उभारण्यात येत आहेत. ससुन रुग्णालयासह सर्वच रुग्णालयातील बेडची संख्या वाढवण्यात येत आहे. व्हेन्टीलेटर्स, आयसीयु आणि ऑक्सिजन बेडची संख्या वाढवण्यावर भर असल्याचे यावेळी सांगण्यात आले. गरजू रुग्णांना हे बेड उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र व्यवस्थापन यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे.
खासगी रुग्णालयांचंही सहकार्य मिळत आहे. खाजगी रुग्णालयांना त्यांच्या गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टर, भूलतज्ज्ञ, फिजिशियन, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई सेवा देणारे कर्मचारी आदी उपलब्ध होतील, याचेही प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.