सोलापूर : सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कोरोना बाधित रूग्णांशी संवाद साधला आहे. शासकीय रूग्णालयातील कोरोना कक्षात जाऊन त्यांनी तेथील सुविधाची पाहणी करून डाॅक्टर आणि नर्सेस यांचे कौतुक केले आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या या कृतीची सगळीकडेच चर्चा होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज सकाळी पर्यंत ८६० जणांना कोरोना संसर्ग झाल्याची आकडेवारी आहे. कोरोना संसर्गामुळे ७८ जणांचा बळी गेला आहे.  ३५१ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. पण कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने सोलापूर कर धास्तावले आहेत.



सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कोरोना संसर्ग अधिक वाढू नये यासाठी सतत बैठका वर बैठका घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. पालकमंत्री भरणे फक्त सूचना करण्यावरच थांबले नाहीत. 


प्रशासना सोबतची बैठक संपल्यानंतर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पीपीई कीट अंगात घातला आणि त्यांनी शासकीय रूग्णालयातील कोरोना बाधितांवर उपचार होत असलेला कक्ष गाठला. कोरोना संसर्ग झालेल्या रूग्णांशी त्यांनी संवाद साधला. कशी व्यवस्था आहे. घाबरू नका लवकर बरे व्हाल. शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्या सोबत संवाद साधतोय. अस बोलत कोरोना बाधित रूग्णांना त्यांनी आधार दिला.



पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या कक्षातील स्वच्छता गृहाची सुध्दा तपासणी केली . तिथे असणारी स्वच्छता पाहून समाधान व्यक्त केले.  कोरोना रूग्णावर सुरू असलेल्या उपचाराबाबत समाधान व्यक्त करून डाॅक्टर आणि नर्सेस यांचे कौतुक केले. आपण कोरोनाचा संसर्ग थांबवू असा विश्वास त्यांनी सोलपूरकराना दिला आहे.